

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शाहूपुरी पहिल्या गल्लीतील तात्यासाहेब मोहिते शाळेसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाची ओळख पटली असून, त्या वृक्षाचे नाव 'रोहन' तर शास्त्रीय नाव 'सोयमिडा फेबि—फ्युजा' असे आहे. कोल्हापूर शहर परिसरात या वृक्षाची प्रथमच नव्याने नोंद झाली आहे. रोहन वृक्ष फक्त भारत व श्रीलंका देशांत आढळतात. हा वृक्ष उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध— प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील कोरड्या पर्णझडी जंगलात आढळतो.
रोहन वृक्ष मेलिएसी म्हणजेच कडुनिंबाच्या कुळातील आहे. काही महिन्यांपूर्वी हा वृक्ष निसर्गप्रेमी परितोष उरकुडे यांनी निदर्शनास आणून दिला होता. त्यावेळी या वृक्षाला फुले नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती. गेल्या आठवड्यापासून यावृक्षावर फुलांचा बहर आल्याने हा वृक्ष रोहनच असल्याचे स्पष्ट झाले. या वृक्षास रोहिन, रुहिन, रक्तरोहन, रोहिणी, मांसरोहिणी अशी अनेक नावे असून, इंग्रजीत 'इंडियन रेड वूड' असे त्याचे नाव आहे. हा पर्णझडी वृक्ष 12 ते 15 मीटर उंच वाढतो. खोड गुळगुळीत सरळसोट उंच वाढणारे असून, खोडाच्या अगदी टोकावर अनेक फांद्या तयार होतात. साल जाड असून कडवट चवीची असते. पाने संयुक्त, फांद्यांच्या टोकांवर दाटीवाटीने येतात. पाने लंबगोलाकार किंवा आयताकृती आकाराची असून, पानाचे टोक विशालकोनी असते.
फुले लहान, पिवळसर-पांढरी व द्विलिंगी असून, पाने बेचक्यातून येणार्या बहुशाखीय 20 ते 40 सें.मी. लांब पुष्पमंजिरीत येतात. पाकळ्या 4 ते 5, सुट्या व टोकावर खाच असणार्या, पुंकेसर 8 ते 10, एकमेकांस चिकटल्याने आखूड पुंकेसरनलिका तयार होते. फळे बोंडवर्गीय, अंडाकृती, लाकडी, पाच भागांत फुटणारी. बिया चपट्या, पंखधारी असतात.
रोहनचे लाकूड लाल रंगाचे, जाड व टणक असल्याने आकर्षक फर्निचर करण्यासाठी वापरतात. साल औषधात वापरतात. आंवेत व अतिसारात सालीचे चूर्ण देतात. ताप कमी होण्यास साल पूर्ण उपयुक्त आहे. सालीच्या काढ्याने व—ण धुतात, बस्ती देतात व गुळण्या करतात.संधिवाताच्या सुजेवर सालीचा लेप लावतात.
कोल्हापुरातील रोहन या दुर्मीळ वृक्षाभोवती असणारा लोखंडी ट्री गार्ड खोडात शिरला असून, खोडाच्या तळात सिमेंट ओतलेले आहे. यामुळे हा वृक्ष वाळून नष्ट होण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने याची नोंद घेऊन हा दुर्मीळ वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत.
– डॉ. मधुकर बाचूळकर
ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ