राज्यातील सत्तांतराने कोल्हापूरच्या राजकारणाचा सारीपाट बदलला! भल्याभल्यांची होणार दमछाक

राज्यातील सत्तांतराने कोल्हापूरच्या राजकारणाचा सारीपाट बदलला! भल्याभल्यांची होणार दमछाक
Published on
Updated on

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : राजकारणाचा सारीपाट बदलला की, सोंगट्या आपला नवा घरोबा करतात. यातून नवी राजकीय समीकरणे जन्माला येतात आणि जे भविष्यात अवघड वाटत होते ते सोपे होते, तसे सहजशक्य वाटणार्‍या गोष्टी अवघड बनतात. कोल्हापूरच्या राजकारणाची स्थिती सध्या अशी आहे. काल-परवापर्यंत महाआघाडी आपल्या एकजुटीतून भाजपला सत्तेच्या जवळपास फिरकू देणार नाही, अशी स्थिती होती; परंतु राज्यातील सत्तांतराने परिस्थिती बदलली आहे.

आता काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत दिग्गज म्हणून वावरणार्‍या नेत्यांना आपल्या विजयासाठी दमछाक करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले असून नव्या राजकीय समीकरणाने पुन्हा एकदा भाजप, त्यांच्या परिघात नसलेले; पण अनुकूल असलेले नेते आणि शिवसेनेतील शिंदे गट यांची आघाडी जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे ताब्यात घेऊ शकतील, असा राजकारणातील बदलत्या वार्‍याचा सूर आहे.

जिल्ह्यात आता भाजप पुन्हा चर्चेत
महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुका झाल्या, तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेत येईल, असे वातावरण होते; परंतु बहुमत असूनही मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्‍नावरून युती फिसकटली आणि सत्तेचा एक नवा सारीपाट मांडला गेला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसली. तसे कोल्हापूरच्या राजकारणातून भाजप दूर फेकला गेला. अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन एकेक गड सर करीत आपले बस्तान इतके घट्ट बसविले की, भविष्यात निरंकुश सत्तेचे आपण स्वामी झालो, अशा थाटात त्यांचा वावर होता; परंतु राज्यातील सत्तेच्या एका बंडाने या मनोरथाला हादरा दिला. त्यातच भाजपने राज्यसभेच्या सातव्या जागेवर धनंजय महाडिकांना निवडून आणत जिल्ह्यातील राजकारणाच्या बदलाचे संकेतही दिले. आता जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे हे वातावरण इतक्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे की, ज्यांचे स्थान डळमळीत समजले जात होते, ते 'सेफ झोन'मध्ये आणि ज्यांच्या मतदारसंघात सूर्य मावळणार नाही, असे छातीठोकपणे काम जे करत होते, त्यांच्यावर मतदारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

…तर शहर उत्तर मतदारसंघावर भाजपचा कब्जा
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात इचलकरंजीत आवाडे आणि शाहूवाडी-पन्हाळ्यात विनय कोरे हे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना घेऊन भाजपने महाविकास आघाडीशी दोन हात करण्याचा प्रयत्नही केला होता; पण हा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. आता मात्र शिवसेनेच्या बंडाने या प्रयत्नांच्या यशस्वितेची टक्केवारी मात्र वाढली आहे. बदलत्या राजकारणात भाजपने साथ दिली, तर विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांचा नव्या विधानसभेतील प्रवेश सुकर होऊ शकतो. शिवाय, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने मिळविलेली लक्षणीय मते पाहता क्षीरसागर, मंडलिक, महाडिक यांची ताकद लागली, तर शहर उत्तर मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी भाजप आघाडीकडे सत्तेचा लंबक झुकू शकतो.

महाडिक-मंडलिक आता साथ—साथ!
कोल्हापूर दक्षिण हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार सतेज पाटील आणि विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या गटांचे द्वंद्व सर्वपरिचित आहे. राजकारणात महाडिक गटाची पीछेहाट करीत सतेज पाटील यांनी या मतदारसंघावर आपली पक्की मांड ठोकली होती. आता महाडिकांकडे खासदारकी आली. पाठोपाठ राज्यात सत्तांतर झाले आणि एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले महाडिक-मंडलिक आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. या राजकीय समीकरणाने कोल्हापूर दक्षिण ताब्यात ठेवण्यासाठी सतेज पाटील यांना जंग जंग पछाडावे लागेल, अशी प्राथमिक स्थिती आहे.

कागलमध्ये 'हाय व्होल्टेज' लढतीचे संकेत
कागलमध्ये तर राजकीय भूकंपच झाला आहे. ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे विद्यमान खासदार संजय मंडलिक काल-परवापर्यंत विद्यमान आ. हसन मुश्रीफांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांचा गट इतका एकसंध झाला की, खासदार सदाशिवराव मंडलिकांचा मुश्रीफांविरोधातील संघर्ष विस्मृतीत गेला की काय, अशी स्थिती होती; पण एका झटक्यात त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने वातावरण बदलले आहे. तेथे भाजपचे समरजितसिंह घाटगे समशेर पाजरून उभे होते. मंडलिक गटाच्या सोयरिकीने घाटगे-मुश्रीफ यांच्यातील मतांचे अंतर मोठे होते. आता घाटगेंची सक्रियता आणि मंडलिकांचे पाठबळ लक्षात घेतले, तर मुश्रीफांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरी बसून विजय मिळविणे शक्य नाही, हे मात्र निश्‍चित. अर्थात, गेल्या अडीच वर्षांत बदललेल्या पाण्याने कोल्हापूरच्या राजकारणालाही दिशा दिली असली, तरी येणार्‍या अडीच वर्षांमध्ये हे पाणी कशी दिशा बदलते, यावर राजकारणाचे चित्र अवलंबून असेल; पण सध्या तरी कोल्हापूरच्या राजकारणाचा सारीपाट बदलला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news