

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ती कोल्हापूरभोवतीच फिरत आहे. सुरुवातीला संभाजीराजे यांच्या संभाव्य उमेदवारीपासून सुरू झालेली निवडणूक संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्या लढतीपर्यंत आली. लढतही झाली; पण कोण विजयी, हे गुलदस्त्याचत राहिले आणि कोल्हापूरचा तिसरा खासदार कोण, याची शिगेला पोहोचलेली उत्कंठा, हुरहुर कायम ठेवून गेली. आता पुन्हा नव्याने डाव मांडणार की याच मतांची मोजणी होणार, हे निवडणूक आयोग ठरवेल. तोपर्यंत ही हुरहुर आणि उत्कंठाही कायम राहणार आहे.
संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने धक्कातंत्र देऊन संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरुद्ध कोण लढणार, याची चर्चा सुरू असतानाच भाजपने कोल्हापूरच्या लाल मातीतील पैलवान धनंजय महाडिक यांंना संजय पवार यांच्या विरोधात राज्यसभेच्या आखाड्यात उतरविले आणि तिथून चुरस सुरू झाली.
सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय शत्रूत्व पाहता या निवडणुकीला बघताबघता याच दोघांतील लढतीचे स्वरूप आले. पडद्यामागील अनेक हालचाली पार करीत अखेर मतदानाचा दिवस उजाडला. सकाळपासून संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक क्षणाक्षणाची हालचाल टिपत होते. त्याची माहिती घेत होते. मुंबईत गेलेल्या समर्थकांशी ते सातत्याने संपर्कात होते. मतदान संपले आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली. सायंकाळी पाच वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र, यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे या महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतपत्रिका दाखविण्याच्या पद्धतीवर भाजपने आक्षेप घेतला, तर महाविकास आघाडीने नवनीत राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतपत्रिका दाखविण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण झाला.
त्या पार्श्वभूमीवर समर्थक आणि उमेदवारांच्या कुटुंबीयांमध्ये धाकधूक वाढली. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांच्या निवासस्थानी त्यांचे कुटुंबीय प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून होते. संजय पवार यांच्या पत्नीने शुक्रवारचा उपवासही केला होता. यशाचे माप पदरी पडणार; मात्र निकाल जाहीर होईपर्यंत धाकधूकही असणार, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबीयांनी व्यक्त केली. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत मुक्कामाला आहे. दोघांच्याही समर्थकांत पैजा लागल्या होत्या. त्यामुळे कधी एकदा निकाल लागतो आणि आपली पैज वसूल करतो, अशी त्यांची अवस्था होती; मात्र हुरहुर… उत्कंठा आणि धाकधूक कायम ठेवत निकाल मात्र लांबला आहे.