जयसिंगपूर ; संतोष बामणे : एकनाथ शिंदे यांच्या गटात शिरोळचे आमदार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सामील झाल्याने गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागल्याने शिरोळच्या राजकारणालाही नवे वळण लागले आहे. त्यामुळे यड्रावकर गटाला उभारी मिळाली आहे. नव्या मंत्रिमंडळात यड्रावकरांना कोणत्या खात्याचा पदभार मिळणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
शिरोळमधून यड्रावकरांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांना पराभूत केले होते. तालुक्यात यड्रावकर यांच्याविरोधात सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी, भाजप, शिवसेना, असे असताना यड्रावकरांनी तालुक्याच्या विकासासाठी कुणावरही टीका न करता आपले काम सुरू ठेवले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही गणपतराव पाटील यांचा पराभव केला. शिवसेनेचे मंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बंड केले. तर दुसरीकडे ना. यड्रावकर यांना मंत्री शिंदे यांच्या माध्यमातूनच मंत्रिपद मिळाल्याने क्षणाचाही विचार न करता ना. यड्रावकर यांनी मंत्री शिंदे यांच्या बंडात सहभागी होऊन पाठबळ दिलेे.
तालुक्यात ना. यड्रावकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून ना. यड्रावकरांचा निषेध केला होता. सध्या एकनाथ शिंदे गट व भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. या सत्तास्थापनेत यड्रावकरांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरोळच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळणार असून, यड्रावकरांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
उल्हास पाटील यांच्यासमोर नवी आव्हाने
शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेनेबरोबरच राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील आगामी निवडणुकांत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यड्रावकरांचा गट एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने मूळच्या शिवसेनेच्या गटाला आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सा. रे. पाटील, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक या दोघांचा पराभव करून उल्हास पाटील शिवसेनेच्या धनुष्यावर विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हिरिरीने मोठा प्रयत्न केला. शिवाय, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी कन्यागत महापर्वकाळच्या माध्यमातून तालुक्याला 121 कोटी रुपयांचा निधी आणला होता. यातून तालुक्यातील तीर्थस्थळे, घाट, बसस्थानक, रस्ते, गटारी, पार्किंग, भक्तनिवास यासह विविध कामे उभारली आहेत. उल्हास पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यासाठी पाच वर्षांत 350 कोटींहून अधिक रुपयांचा निधी मिळाला होता.
या विकासकामांच्या पाठबळावर पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. यात मात्र यड्रावकरांनी पाटील यांचा पराभव केला. आता उल्हास पाटील यांना आगमी निवडणुकांत आपली ताकद दाखवावी लागणार आहे.