राजर्षींच्या अंत्यविधीचा साक्षीदार ‘संस्थान शिवसागर’

राजर्षींच्या अंत्यविधीचा साक्षीदार ‘संस्थान शिवसागर’

कोल्हापूर : सागर यादव
यांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी मुंबई येथील 'पन्हाळा लॉज' या राजवाड्यात झाला. दुसर्‍या दिवशी त्यांचे पाथिर्र्व कोल्हापुरात आणण्यात आले. 7 मे रोजी पंचगंगा नदीकाठी असणार्‍या 'संस्थान शिवसागर' येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात या स्थळालाही विशेष महत्त्व आहे.

राजर्षी शाहूंचे अंत्यसंस्कार जरी पंचगंगा नदीकाठच्या 'संस्थान शिवसागर'मध्ये झाले असले तरी त्यांनी हयातीत लिहून ठेवलेल्या इच्छा व आदेशानुसार अलीकडेच त्यांची समाधी शाहूप्रेमींनी नर्सरी बाग परिसरातील शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी यांच्या स्मृती मंदिर परिसरात उभारली आहे.'बहुजन हिताय, बहुजन सुखाय', या ध्येय-उद्देशाने आपली संपूर्ण हयात लोककल्याणासाठी खर्ची घालण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले. अवघे 48 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी 28 वर्षे अखंड लोककार्याचा वारसा जपत आपल्या रयतेच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीचे कार्य केले. यामुळे आज शंभर वर्षांनंतरही 'राजर्षी' ही तीन अक्षरे कोल्हापूरकरांचा श्‍वास असल्याचे वास्तव आहे.

पंचगंगा नदीकाठी अंत्यसंस्कार

राजर्षी शाहूंचे निधन मुंबईत झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मोटारीतून कोल्हापूरला आणण्यात आले. महाराजांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांतून ताबडतोब सर्वत्र पसरली होती. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर रस्त्यावर ठिकठिकाणी लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. मोटार थांबवून लोकांनी पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. सातारकर छत्रपतींनीही दर्शन घेतले. सायंकाळी पार्थिव नवीन राजवाड्यात आणल्यानंतर दरबार हॉलमध्ये स्वतंत्र सिंहासनावर स्थानापन्न करण्यात आले. राजघराण्यातील महिला व मानकरी लोकांनी स्नान घातले. यानंतर शुभ— वस्त्रावर भरजरी रेशमी कपडे घालून महाराजांचा देह सजवून तो एका मोठ्या पालखीत बसविण्यात आला. त्यानंतर भोयांनी पालखी उचलली.

नव्या राजवाड्यातून लवाजम्यासह पालखी जैन बोर्डिंगमार्गे पंचगंगा नदीमार्गे 'संस्थान शिवसागर' (छत्रपती घराण्याची स्मशानभूमी) येथे नेण्यात आली. येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंदिराजवळ चंदनाची लाकडे व शेणी यांचे सरण रचण्यात आले होते. सूर्योदयावेळी युवराज राजाराम महाराज यांनी महाराजांच्या पाथिर्र्वास अग्नी दिला. यानंतर सैनिकांनी 48 तोफांची सलामी देत अखेरची सलामी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news