

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू छत्रपतींचे सामाजिक सुधारणांचे कार्य अपूर्व आहे. आजही अनेक ठिकाणी अशा सुधारणांची गरज आहे. शाहूंचे ते कार्य पुढे न्या, ती राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे; त्याला लोकांनीही साथ द्यावी, असे आवाहन शाहू महाराज यांनी रविवारी केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित 'लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वा'ची केशवराव भोसले नाट्यगृहात आज सांगता झाली.
शाहू समाधिस्थळ विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच विधवा प्रथा बंद करणार्या हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतींना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली. शाहू स्मारकाच्या कामाला आता गती दिली जाईल, त्याकरिता येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल. शाहू जयंतीदिनी शाहू जन्मस्थळाच्या लोकार्पणाचा प्रयत्न राहील, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शाहूंचे विचार सदैव तेवत ठेवू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहूंचे कार्य हे केवळ कोल्हापूर आणि राज्यापुरते मर्यादित नाही; ते विश्वव्यापी आहे, असे सांगत शाहू महाराज म्हणाले, सर्व समाज एक आहे, माणूसजात ही एकच जात आहे, हा शाहूंनी दिलेला विचार समजून घेऊन पुढे नेला पाहिजे. कोठे मशीद, कोठे हनुमानदर्शन असे लोकशाहीत महत्त्वाचे नाही. जात-धर्माच्या नावावर समाजाचे ध्रुवीकरण सुरू आहे.
कोल्हापूरकर खर्या अर्थाने शाहूंचे विचार कृतीतून जोपासण्याचे काम करत आहेत, असे सांगत राज्यमंत्री कदम म्हणाले, राजर्षी शाहूंनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. उपेक्षित, मागासलेल्या वर्गाला वर आणण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. कोल्हापूरच्या मातीतून चळवळ पेटली, त्यातून देशभर वणवा पेटला. या वणव्यात जाती-धर्मातील भेद मोडून उपेक्षितांना वर आणण्याचे काम झाले. सामाजिक न्याय विभागाकडून तृतीयपंथीयांच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने शाहू विचारांचा वारसा लोकांसमोर, प्रामुख्याने नव्या पिढीसमोर नव्या संकल्पनेतून मांडला. हजारो हात एकत्र आले, प्रत्येकाने हे माझे कार्य आहे या भावनेतून काम केले. त्यातून विविध कार्यक्रम झाले, उपक्रम झाले. त्या सर्वाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शाहूंचे कार्य किती मोठे आहे, हे या कार्यक्रमांतून दिसले. हा वारसा कृतीतून जोपासण्याची जबाबदारी आहे. पर्वाची सांगता झाली असली तरी यानिमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर होत राहतील.
कोणतरी भोंगे वाजवतो, कोणतरी येतो आणि कबरीवर जातो. जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे वातावरण तयार होत आहे. मात्र, जनता शांत राहिली आहे, हे शाहूंच्या विचारांची देण आहे, असे सांगत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहूंच्या विचाराचा पगडा किती घट्ट आहे हे लोकांनी दाखवून दिले. पती निधनानंतर मिळालेले दु:ख आणि त्यानंतर सातत्याने अपमानित जगणं वाट्याला येणारी विधवा ही कुप्रथा हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतींने बंद केली. सर्वांनीच ती बंद करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, आपण ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकलो, ज्या वसतिगृहात राहिलो, ती सर्व शाहूंच्या प्रेरणेतील होती. शाहू महाराज नसते तर कदाचित आपणही नसतो. जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रास्ताविकात म्हणाले, दहा महिन्यांत काम केल्यानंतर आपणही शाहूंचे अनुयायी झालो. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. हृषीकेश केसरकर यांनी आभार मानले.
दि. 6 मे रोजी शंभर सेकंद स्तब्ध राहून शाहूंना वाहिलेली आदरांजली हा विश्वविक्रम ठरला. त्याचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डसचे प्रतिनिधी महेश कदम यांनी मान्यवरांकडे सुपूर्द केले. यानंतर हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीचा तसेच शुभांगी थोरात, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, स्वाधार योजनेतील लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तृतीय पंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. या पर्वासाठी योगदान देणार्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधी, समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आ. प्रा. जयंत आसगांवकर, आ. जयश्री जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.