

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजल्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक कारणाखेरीज बाहेर फिरण्यासाठी ही बंदी असेल. त्याचबरोबर अनेक निर्बंधांचीही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार रंकाळा, कळंबा तलाव, पर्यटन व ऐतिहासिक ठिकाणांसह धरणस्थळांवर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी रात्री प्रसिद्ध केले. त्याचे उल्लंघन करणार्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री शहराच्या प्रमुख मार्गांवरून संचलन करण्यात आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने नव्याने घातलेल्या निर्बंधांची रविवारपासून जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार पहाटे 5 ते रात्री 11 या वेळेत जिल्ह्यात जमावबंदी राहणार आहे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करणार
रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही या कालावधीत बाहेर फिरता येणार नाही. रात्रीच्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
कोल्हापूर शहरातील रंकाळा, कळंबा तलावांवर नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. यासह जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, तिलारी, पाटगाव, मानोली, कोदे, चित्री, जंगमहट्टी या धरणस्थळांवर तसेच कागल येेथील जयसिंगराव तलावही नागरिकांसाठी बंद राहणार आहे.
ऐतिहासिक, पर्यटनस्थळांवर बंदी
कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळासह शिवाजी विद्यापीठाच्या बोटॅनिकल गार्डनमध्येही नागरिक, विद्यार्थ्यांना फिरता येणार नाही. याखेरीज पावनगड, खिद्रापूर, पावनखिंड, पोहाळे येेथील गुहा, पळसंबे, सांगशी, असळज, चक्रेश्वरवाडी, नेसरी, सामानगड, महिपाळगड, कलानंदीगड या पर्यटन आणि ऐतिहासिक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. राधानगरी, दाजीपूर जंगल, चांदोली, मोरजाई पठार, विशाळगड रोड, मसाई पठार, आंबा देवराई व महिपाळगडावर जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जेऊर, वेसरफ आणि चित्री या ठिकाणच्या साहसी खेळांच्या तसेच बांदिवडे यासह इतर पर्यटन ठिकाणांसह वस्तुसंग्रहालये नागरिकांना बंद राहणार आहेत.
शासकीय कार्यालयांत परवानगीशिवाय प्रवेश नाही
विवाह तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहता येणार आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. शासकीय कार्यालयांत कार्यालय प्रमुखांच्या लेखी व स्पष्ट परवानगीशिवाय अभ्यागतांना येण्यास बंदी राहणार आहे.
शॉपिंग मॉल्स, हॉटेल्समध्ये 50 टक्के उपस्थिती
शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंटस् व हॉटेल्स 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येणार आहेत. लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश दिला जाणार असून, रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत हे मॉल्स, हॉटेल्स बंद ठेवावी लागणार आहेत. चित्रपटगृहे,नाट्यगृहांतही 50 टक्केच प्रवेश दिला जाणार आहे. या ठिकाणीही लसीचे दोन्ही डोस आवश्यक करण्यात आले आहेत.