माजी सरपंचासह सात जणांना अटक

माजी सरपंचासह सात जणांना अटक

Published on

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा

सोनाळी (ता. कागल) येथे मंगळवारी रात्री पोलिसांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी व वैद्य कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला. यापैकी माजी सरपंच सत्यजित पाटीलसह सात जणांना अटक केली आहे.
माजी सरपंच सत्यजित बाळासो पाटील, प्रवीण द. पाटील, अभिनंदन अ. पाटील, सुनील सं. पाटील, संतोष शि. भोसले, पांडुरंग वसंत पाटील व प्रथमेश द. म्हातुगडे अशी त्यांची नावे आहेत. यांच्यासह अनिल पाटील, शंकर पाटील, शुभांगी पाटील, वत्सला खुळांबे अशा अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला.

वरद खून प्रकरणातील संशयित आरोपी मारुती वैद्य याचे कुटुंब गावात आल्याने जमावाला भडकवून वरील अकरा जणांसह 50 जणांच्या जमावाने मारुती वैद्य याची पत्नी, भाऊ व भावजय यांच्यावर चटणी टाकून मारहाण केली, तसेच पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी फिर्याद दिली.

दरम्यान, वरदच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सात वर्षीय वरदची हत्या झाली. त्याचा तपास सुरूच आहे. संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सात महिने गावाबाहेर असलेले वैद्य कुटुंबीय मंगळवारी गावात आले. या कुटुंबापासून आपणास धोका असल्याने त्यांना गावाबाहेर ठेवावे, अशी विनंती आहे.

ग्रामस्थांनी वैद्य कुंटुबाचा गावात निषेध करण्यासाठी निषेध फेरी काढली. वैद्यच्या दारात फेरी येताच पोलिस, ग्रामस्थ व पाटील-वैद्य या दोन कुटुंबासोबत लाठ्या-दगडफेक अशी धुमश्चक्री उडाली. यात साहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे व अन्य दोन पोलिस तसेच वरदचे आजोबा शंकर पाटील, चुलते प्रवीण व दत्तात्रय, चुलती सारिका पाटील जखमी झाले. या घटनेनंतर रात्रीपासून अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सोनाळी गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

दगडफेक करणार्‍यांवर कडक कारवाई : पोलिस अधीक्षक

दगडफेकीत पोलिस अधिकार्‍यांसह ग्रामस्थ जखमी झाले. या घटनेची कसून चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी सांगितले. बलकवडे यांनी बुधवारी सोनाळी येथे भेट देत ग्रामस्थांची शांतता बैठक घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news