महापुरावेळी कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई : राजेंद्र पाटील

महापुरावेळी कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई : राजेंद्र पाटील
Published on
Updated on

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : महापूर रोखण्यासाठी कर्नाटक शासनाबरोबर समन्वय कायम राहील. 2019 च्या महापुरात मनुष्य व पशुधनाच्या हानीबरोबर शेती, घरांचे न भरून निघणारे नुकसान झाले होते. त्याचबरोबर 2021 मध्ये आलेल्या महापुरात याचे प्रमाण कमी झाले असले तरी यातही शेतकर्‍यांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या महापूर येऊ नये यासाठी शासनस्तरावर उपाययोजना होत आहेत. यापुढेही महापूर आला तर जे अधिकारी आपत्ती काळात कामचुकारपणा करतील, अशांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.

जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ना. यड्रावकर पुढे म्हणाले, महापूर काळात ग्रामसेवक, तलाठी यांनी आपल्या सजामध्ये थांबणे गरजेचे आहे. लाईफ जॅकेट, यांत्रिकी बोटी याचे नियोजन करून योग्य ठिकाणी ठेवा. पशुधन व मनुष्यधनाची हानी थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. जनावरांना चारा, पूरग्रस्तांचे जेवण, वैद्यकीय व्यवस्था, शौचालय, पिण्याचे पाणी, पूर ओसरल्यानंतर घरे, शेतीची पंचनामे व्यवस्थितपणे पूर्ण करावेत. प्रत्येक अधिकार्‍याने आपण आपल्या कामाची जाणीव ठेवून जबाबदारीने काम करावे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हणाले, प्रशासनातील प्रत्येक घटकाने महापुराला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. विशेषत: आरोग्य विभागाने ज्या गावात अतिदक्षतेचे रुग्ण आहेत, अशांची यादी करावी. नागरिकांनी मागील महापुराच्या अनुभवावर विसंबून न राहता जनावरे, कुटुंब, साहित्य, औषध, मोबाईल, कपडे व कोरडे खाद्यपदार्थ घेऊन स्थलांतरित व्हावे. शिवाय जिल्हा व तालुका प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात म्हणाले, एक जूनपासून जिल्हा तालुका पातळीवर कंट्रोल रूम सज्ज आहे. पोलिस, रेस्क्यू टीम, बोटींचे सराव, कृषी पंचनाम्याची प्रात्यक्षिके तत्काळ पूर्ण करावे.

यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी शिरोळ तालुक्यातील 52 गावे व 3 शहरांत येणारा महापूर व त्यावरील उपाययोजना, छावण्या व सोयी सुविधाबाबती माहिती दिली. गटविकास अधिकारी शंकर कवितगे यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर तयारी प्रशासनामोर मांडली. दरम्यान, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, एस. टी. महामंडळ, महावितरण, शिक्षण विभाग, पोलिस विभाग, पालिका विभाग, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, रेस्क्यू टीम विभाग यांच्यासह अन्य विभागाने महापूर काळासाठी केलेल्या तयारीची मांडणी केली. तसेच आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगेंनी महापूर येऊ नये यासाठीच उपाययोजना कराव्यात. शिवाय कर्नाटकात होत असलेल्या पुलांच्या ठिकाणी भरावाऐवजी कमानी उभाराव्यात यासह मुद्दे मांडले.

यावेळी डीवायएसपी रामेश्वर वैजाने, बी. बी. महामुनी, मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी, निखिल जाधव, पो. नि. राजेंद्र मस्के, दत्तात्रय बोरीगिड्डे, स.पो.नि. बालाजी भांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पी. एस. दातार, डॉ. पांडुरंग खटावकर, कार्यकारी अभियंता वैभव गोंदील यांच्यासह मंडल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व पोलिसपाटील उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news