कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पाच ठेवीदारांच्या नावावरील रक्कम परस्पर काढून व स्टेशनरीची विक्री करून भुदरगड नागरी पतसंस्थेची 11 लाख 11 हजार 114 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या साईक्स एक्स्टेंशन-कोल्हापूर शाखेच्या शाखाधिकार्यांवर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णात दत्तात्रय सावंत (वय 62, रा. वडणगे, ता. करवीर) असे या शाखाधिकार्याचे नाव आहे. याबाबत विशेष लेखापरीक्षक (वर्ग 1) धनंजय भाऊसाहेब पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सावंत हे 2002 ते 2011 या कालावधीत भुदरगड पतसंस्थेच्या साईक्स एक्स्टेंशन शाखेत शाखाधिकारी होते. सावंत यांनी या शाखेतील 5 ठेवीदारांच्या ठेवीतील 2 लाख 68 हजार या रक्?कम व एक सभासदाच्या सेव्हिंग खात्यावरील 99 हजार 636, 65 रुपये अशी 3 लाख 67 हजार 636 रुपये रक्कम संस्थेच्या एका कर्जदाराच्या खात्यावर वर्ग केली व ती परस्पर काढून घेऊन अपहार केला. याच शाखेतील डेड स्टॉकवरील स्टेशनरी एकूण रक्कम 7 लाख 43 हजार 477 रुपयांची परस्पर विक्री केली, ही रक्कम सावंत यांनी परस्पर हडप केली आहे.
सावंत यांनी या शाखेतील एकूण 11 लाख 11 हजार 114 रुपयांचा अपहार करून संस्थेची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. यानंतर सहकार आयुक्तांनी या संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पतसंस्थेच्या 2013 ते 2017 या आर्थिक वर्षाच्या कामकाजाची वैधानिक लेखापरीक्षणासाठी तत्कालीन जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील यांनी केली होती.पाटील यांनी तपासणीमधून हा अपहार उघड केला आहे.