फिफा वर्ल्डकप 2022 : धक्कादायक निकालांमुळे कोल्हापुरात उत्सुकता शिगेला

फिफा वर्ल्डकप 2022 : धक्कादायक निकालांमुळे कोल्हापुरात उत्सुकता शिगेला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता धक्कादायक निकालांमुळे चांगलीच वाढली आहे. साखळी सामन्यांत अनेक नामवंत संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जर्मनी, बेल्जियम यासारखे संघही स्पर्धेबाहेर गेले आहेत. यामुळे बाद फेरीतील सामन्यांची चर्चा चांगलीच रंगली आहे. फुटबॉलनगरी कोल्हापूर याला अपवाद नाही.
स्पर्धेतील बाद फेरी आणि निकालांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. कोणत्याही संघाबद्दल ठामपणे मत व्यक्त करणे सध्या तरी कठीण झाले आहे. तरीही फुटबॉल समर्थक आपला संघ जिंकेल, असे ठामपणे सांगत आहेत. यामुळे समर्थकांची चढाओढ वाढली आहे. पेठांमध्ये गल्ली-बोळांतील गप्पा, सोशल मीडियावर फुटबॉल समर्थकांतील ईर्ष्या पाहायला मिळत आहे.

अमरदीप कुंडले : दक्षिण अमेरिकन व युरोपियन देशांचा दबदबा त्यांनी मोडून काढल्याचे जाणवले. तरीदेखील आता इथून पुढील प्रवास हा जिंकू किंवा मरू, असा असल्याने नवोदित संघ कितपत तग धरतात, हे आताच सांगता येणार नाही; परंतु अनुभवी संघांना फायदा होईल, असे वाटते. त्यातल्या त्यात दमदार राखीव खेळाडू ज्यांच्याकडे असतील ते संघ जास्त टिकू शकतील, असे वाटते.

सतीश सूर्यवंशी : स्पर्धेतील साखळी सामने रोमहर्षक व पारंपरिक संघांना आश्चर्यकारक धक्का देणारे झालेत. साखळी सामन्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकाही संघाला साखळी फेरीतील सर्व सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. प्रेक्षकांच्या पसंतीच्या नामांकित खेळाडूंच्या संघांनी बाद फेरीत प्रवेश केल्यामुळे स्पर्धेतील पुढील सामन्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. बाद फेरीतील सामन्यांतील खेळात नक्कीच चुरस पाहायला मिळेल. अर्जेंटिना, ब—ाझील, फ्रान्स, इंग्लंड हे या स्पर्धेच्या विजेते पदाचे प्रमुख दावेदार असतील.

विकास पाटील : यंदाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा धक्कादायक निकालांचीच असणार आहे. सामन्यातील एकूण वेळेच्या काही क्षणांचा खेळ निकाल देणारा ठरणार आहे. यामुळे बाद फेरीत मोठे संघही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात. साखळी फेरीत कोणत्याही संघाला सातत्याने विजय राखता आलेला नाही. जपान, कोरिया यासारख्या संघांनी धक्कादायक निकाल नोंदवत वर्ल्डकपसाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे.

प्रा. डॉ. अभिजित वाणीरे : साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यानंतर 16 संघांना आपला गाशा गुंडाळावा लागला. अनपेक्षितपणे 4 वेळेचा विजेता जर्मनी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. बाद फेरीत हॉलंड, अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड, ब—ाझील, स्पेन, पोर्तुगाल हे संघ सुपर-8 मध्ये जाणारे संभाव्य संघ म्हणून ओळखले जातात; पण इतर संघांना कमजोर समजून चालणार नाही. यामुळे उर्वरित स्पर्धेची चुरस आणि रंगत दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news