पुस्तकांसह मुलांची आता ई-बुक्सशी मैत्री!

पुस्तकांसह मुलांची आता ई-बुक्सशी मैत्री!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  उन्हाळी सुट्ट्यांमध्ये भरवली जाणारी वाचन शिबिरे, ग्रंथालयातील विशेष तासिका आणि सार्वजनिक वाचनकट्टेही कालानुरूप डिजिटल होत आहेत; मात्र आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांचे वेड मुलांमध्ये कायम असल्याचे दिसून येते आहे. केवळ पुस्तकांचे स्वरूप बदलले आहे. सध्या ई-बुक्सच्या माध्यमातून चाचा चौधरी, चिंटू असो वा छोटा भीम यांनी लहानग्यांना भुरळ घातली आहे. पुस्तकांसह ऑनलाईन कॉमिक्समध्ये लहान मुलांच्या जीवनात घडणारे व पुन:पुन्हा अनुभवावे असे अनेक प्रसंग रंजकरित्या मांडण्यात येत असल्याने त्याचा मुलांना छंद जडतो आहे.

पूर्वी प्रचलित असणारे कॉमिक्स काही पडद्याआड गेले तर काही बालपुस्तकांचा खप घटल्याने त्यांचा अंक कमी प्रमाणात आणि मोजक्याच ठिकाणी उपलब्ध होतो आहे. ही कॉमिक्स आजही मुलांचे सोबती बनले असून त्यातील प्रसिद्ध पात्रांना मुलांनी आपलेसे करून घेतले आहे. यातील काही बालपुस्तके आणि कॉमिक्सचे स्वरूप बदलून आता ते ऑनलाईनद्वारे उपलब्ध होत आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असणार्‍या ऑडिओ आणि व्हिडीओ माध्यमातून या बालपुस्तकांतील रंजक कथा मुलांच्या पसंतीस उतरत आहेत. मोबाईलमध्ये एका क्लिकवर जगभरातील विविध विषयांवरील विविध भाषांमधील कॉमिक्स उपलब्ध आहे. यामुळेच डिजिटल लायब—रीचे प्रस्थ अलीकडच्या काळात वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कधी काळी यांचा होता बोलबाला

रामायण-महाभारत, किशोर, कुमार, चांदोबा, चंपक, ठकठक, अमृत, लोकप्रभा, षटकार, चाचा चौधरी, फास्टर फेणे, गलिव्हरचे प्रवास, सिंदबादच्या सफरी, हातिमताई, ईसापनिती, पंचतंत्र, सिंड्रेला, हिमगौरी, अरेबिअन नाईटस, अकबर-बिरबल, कालिदास तथा तेनालीरामन या कॉमिक्सचा काही वर्षांपूर्वी बोलबाला होता. आजही यातील काही कथासंग्रह डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.

सुपर हीरोची मजा आजही कायम

कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, गार्डियन्स गॅलॅक्सी, अटलांटिक सिटी, अ‍ॅव्हेंजर्स, स्पायडर मॅन, थॉर यासारख्या सुपर हीरोजच्या ई -कॉमिक्सना चांगलीच पसंती मिळत आहे. यासह रहस्य आणि भुतांच्या कथांच्या पुस्तकांना बालकांकडून विशेष मागणी केली जाते. चिमुकल्यांच्या बालपणातील हे सुपर हीरो आता पडद्यावर अवतरले असून याच्या पुढील भागांची प्रतीक्षाही ते आवर्जून करताना पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news