

किणी : पुढारी वृत्तसेवा
पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे टोल नाके राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाले असून तब्बल 10 ते 15 रुपयांची दरवाढ करत टोल वसुली सुरूच राहणार आहे. दरम्यान, वाहनधारकांना काही सवलतीही मिळणार आहेत. 20 किलोमीटर परिघातील कार, जीप आदी वाहनांना 315 रुपयांत महिन्याचा पास देण्यात येणार आहे.
2 मे 2022 ला या टोल वसुलीची मुदत संपली असली तरी कोरोना व महापुराच्या कालावधीत काही दिवस टोल वसुली बंद ठेवल्याने या काळातील वसुली भरून काढण्यासाठी 53 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 24 जूनच्या मध्यरात्री संपणार असून हे दोन्ही टोल नाके राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून टोल आकारणीत 10 ते 15 रुपयांची दरवाढ करण्यात येणार आहे,
आता रिटर्न टोलची सुविधाही मिळणार असून 24 तासांत परतीचा प्रवास करणार्या वाहनांना 50 टक्के सवलत मिळेल. जिल्ह्यात नोंदणीकृत असणार्या व्यावसायिक छोट्या वाहनांना जवळपास 50 टक्के सवलत मिळणार आहे. वीस किलोमीटर परिघातील कार, जीपसारख्या हलक्या वाहनांना 315 रुपयांत महिन्याचा पास मिळणार आहे. मालवाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे.
सुरुवातीचे दर हे एकेरी टोलचे तर कंसातील दर दोन टोल नाके ओलांडणार्या वाहनांसाठी : कार, जीप 90 रुपये (135), मध्यम (एलसीव्ही) वाहने 145 (220), बस ट्रकसह अवजड वाहने 305 (460) रुपये. आतापर्यंत मल्टिअॅक्सल वाहनांना ट्रकचाच दर आकारला जात होता. आता यापुढे थ्री अॅक्सल वाहनांना 335 (500), चार ते सहा अॅक्सल वाहनांना 480 (720) तर सात अॅक्सल व त्यापुढील वाहनांना 505 रु. (875) दर आकारण्यात येणार आहेत.