

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकरितेचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेत गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जनमानसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेल्या दै. 'पुढारी'ने इलेक्ट्रॉनिक मीडियात नवे पाऊल टाकले. 'पुढारी न्यूज'चे मंगळवारी दिमाखदार लाँचिंग झाल्यावर कोल्हापूरवासीयांनी जल्लोषी स्वागत केले. विविध संस्था, संघटना, तालीम मंडळे यांच्यासह समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, साखर-पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. सोशल मीडियावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. दरम्यान, विविध मंडळांचे वार्ताफलक 'पुढारी न्यूज'च्या शुभेच्छांनी सजले होते.
मंगळवारी सकाळी घरोघरी टीव्ही स्क्रीनवर 'पुढारी न्यूज' दिसू लागला आणि कोल्हापूरकरांचा ऊर अभिमानाने भरून आला. प्रिंट मीडिया, ब—ॉडकास्टिंग मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, यापाठोपाठ इलेक्ट्रॉनिक मीडियात पदार्पण करत माध्यमातील सर्वच क्षेत्रांत असणारा 'पुढारी' हा पहिलाच वृत्तसमूह ठरला. दै. 'पुढारी'च्या भाऊसिंगजी रोडवरील 'पुढारी भवन' या मुख्य कार्यालयासमोर आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार, कार्यकारी संपादक विजय जाधव, वितरणचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी आनंदोत्सव केला.
कोल्हापूर म्हणजे 'पुढारी' आणि 'पुढारी' म्हणजे कोल्हापूर हे गेल्या आठ दशकांपासून अकृत्रिम जिव्हाळ्याचे नाते आहे. यामुळेच 'पुढारी'चे न्यूज चॅनल सुरू होत असल्याचे समजल्यापासून ते कसे असेल, याबाबत नागरिकांत प्रचंड उत्सुकता होती. सोमवारपासून टीव्हीवर 'पुढारी न्यूज' या नावाने टेस्टिंग सुरू झाल्यापासून तर ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज सकाळी चॅनल सुरू होणार म्हटल्यानंतर अनेकांच्या चेहर्यावर ती दिसत होती. 'पुढारी न्यूज'चे प्रसारण सुरू झाले आणि कोल्हापूरवासीयांच्या चेहर्यावर अभिमान आणि आनंदाचे भाव तरळत राहिले. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटप करण्यात आले. 'पुढारी न्यूज'ला शुभेच्छा देणारे फलक झळकवण्यात आले. मंडळाच्या वार्ता फलकावर, रिक्षा थांब्यावरील फलकांद्वारेही 'पुढारी न्यूज'ला शुभेच्छा देण्यात आल्या.