

शिरोळ ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. प्रकाश आवाडे व आ. विनय कोरे माझ्यासोबत असतील. पाच-सहा दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे भाजप नगरसेवकांच्या भेटीदरम्यान सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. आ. प्रकाश आवाडे व आ. विनय कोरे यांनी अजून भूमिका स्पष्ट केली नाही.दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
पालकमंत्री पाटील यांनी गणपतराव पाटील, अनिल यादव, जयराम पाटील, विजय पाटील यांची भेट घेतली. यादव यांच्या निवासस्थानी भाजपच्या सर्व नगरसेवकांना घेऊन बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर युवा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्याबरोबर पंचवीस मिनिटे चर्चा केली. या चर्चेत नेमकं काय घडलं, याचा तपशील समजू शकला नाही.
पेठवडगाव : पालकमंत्री पाटील यांनी रविवारी येथील सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांची राजाराम चित्र मंदिर येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत आ. राजू आवळे होते. यावेळी सालपे म्हणाल्या, पाठिंबा देण्याबाबत सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, संघटक अजय थोरात व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर विरोधी यादव आघाडीच्या नेत्या विद्या पोळ यांना भेटण्यासाठी मंत्री पाटील यांचा ताफा देवगिरीवर गेला.
पोळ या बाहेरगावी गेल्याने माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या समवेत नगरसेवक संदीप पाटील, गुरुप्रसाद यादव, जवाहर सलगर, संगीता मिरजकर, अनिता चव्हाण यांची बैठक झाली.
वारणानगर ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी रात्री उशिरा जनसुराज्याचे संस्थापक आमदार विनय कोरे यांची वारणानगर येथे भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली.
मागील निवडणुकीत आ. कोरे यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यांना निवडून आणण्यात कोरे यांची महत्त्वाची भूमिका होती. सध्या आमदार कोरे हे भाजपबरोबर असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
ना. सतेज पाटील यांनी रात्री उशिरा आमदार कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे समजते; मात्र चर्चेतील तपशील समजू शकला नाही.