पाणीपुरवठ्यात हलगर्जीपणा केल्यास चावीवाल्यासह अधिकार्यांवर कारवाई- डॉ. कादंबरी बलकवडे
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व्हॉल्व्ह कंट्रोलचे नियोजन करा. पाणी सोडण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यास चावीवाल्यासह अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिला. शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रात बिघाड झाल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व अभियंत्यांची आयुक्त कार्यालयात बैठक झाली.
प्रशासक डॉ. बलकवडे यांनी गळतीच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा. वारंवार बिघाड झाल्याची कारणे सांगू नका. शाखा अभियंत्यांनी भागामध्ये दैनंदिन फिरती करावी. त्याच्या नोंदी हालचाल रजिस्टरमध्ये कराव्यात. उप जलअभियंता यांनी त्याची तपासणी करावी. पाणी सोडणार्या चावीवाल्यांचे दैनंदिन नियोजन करावे, असे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता अजय साळोखे, प्रकल्प जलअभियंता हर्षजीत घाटगे, उप जलअभियंता रावसाहेब चव्हाण, राजेंद्र हुजरे, सर्व वितरण व ड्रेनेज विभागाचे शाखा अभियंता उपस्थित होते.
…तर शाखा अभियत्यांना जबाबदार धरणार
अमृत योजनेतून कामे झालेल्या ठिकाणी जुनी व नवीन लाईन चालू आहे का? याची तपासणी करून त्याचा अहवाल द्यावा. प्रत्येकाच्या कामाच्या नियोजनाचे लिखित आदेश जलअभियंता यांनी करून द्यावेत. सर्वांनी फोन सुरू ठेवावेत. चावीवाल्यावर शाखा अभियंत्यांचे नियोजन नसल्यास शाखा अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

