पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा
येथील शिवतीर्थ उद्यान नागरिक व पर्यटकांसाठी एक आल्हाददायक असे निसर्गस्थळ विकसित झाले असून, पन्हाळ्यात होत असलेली विकासकामे भावी पिढीसाठी उपयुक्त व पन्हाळ्याचा वारसा जतन करणारी आहेत, असे मत आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले.
आ. कोरे यांच्या हस्ते शनिवारी पन्हाळा येथे नगरपालिकेच्या वतीने दोन कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, सर्व माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
प्रशासक व मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी प्रास्ताविक केले. पन्हाळा येथे विशेष पर्यटन क्षेत्र विकास योजना राज्यस्तर व वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत शिवतीर्थ उद्यान रिटेनिंग वॉलचे काम करण्यात आले आहे. यासाठी एक कोटी 60 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती प्रशासक स्वरूप खारगे यांनी दिली. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग 8 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासमोर 25 लाख रुपये खर्च करून वाहनतळ उभारणी करण्यात आली आहे व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर अंतर्गत पन्हाळा क्लब इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रवींद्र तोरसे, जीवन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कांदूरकर, दिनकर भोपळे आदी उपस्थित होते. नगरपालिका अभियंता जयश्री देवकुळे, अधीक्षक अमित माने, संगणक अभियंता मुकुल चव्हाण, सहायक नगररचनाकार अंशुमन गायकवाड, कर निरीक्षक मधुरा गवळी आदींनी संयोजन केले होते