

नृसिंहवाडी ; विनोद पुजारी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी पहाटे तीन वाजता दक्षिणद्वार सोहळा झाला. या सोहळ्यात कृष्णा नदीत स्नान करून शेकडो भाविकांनी ही पर्वणी साधत दर्शन घेतले. येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी श्रींच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेतात. यालाच दक्षिणद्वार सोहळा संबोधतात.
मंगळवारी पहाटे दक्षिणद्वार सोहळा झाल्यामुळे मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले आहेत. आजपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सवमूर्तीवर होतील. त्यामुळे नित्य श्रींच्या उत्सवमूर्तीची फूलमाळांची सजावट सेवेकरी संजय रुके पुजारी यांच्याकडून केली जाणार आहे. पहाटे काकड आरती, शेजारती, सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरात होणार आहेत. साडेसातनंतर धूपारती तसेच ब—ह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा इंदुकोटि स्तोत्राचे पठणही होणार आहे. दरम्यान, गुरुवारी गुरुपौर्णिमेमुळे गर्दी होण्याची शक्यता आहे.