

कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे
निवडणूक राज्यसभेची असो की विधान परिषदेची… कोल्हापूर हे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूर संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आता विधान परिषदेलाही मूळच्या कोल्हापूरच्याच चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात कोल्हापूरचा बोलबाला वाढला आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे. महाविकास आघाडीने चौथा उमेदवार म्हणून सुरुवातीला संभाजीराजे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचे ठरविले. त्यासाठी शिवबंधनाची अट घालण्यात आली. मात्र, संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार देताच संजय पवार या कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांची उमेदवारी जाहीर करून शिवसेनेने राजकारणातील आणखी एका धक्कातंत्राचा वापर केला.
कोणाच्या अगदी संजय पवार यांच्याही ध्यानीमनी नसताना त्यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर करून शिवसेनेने दिलेला धक्का जबरदस्त होता. सहावी जागा बिनविरोध केली, तर विधान परिषद बिनविरोध करू, असा भाजपचा प्रस्ताव होता; मात्र भाजपला राज्यसभा हवी होती. या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या वाटाघाटी फिसकटल्या. त्यानंतर भाजपने कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरले आणि राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिक अशी कोल्हापूरच्याच मल्लांमधील कुस्ती रंगली आहे. या निमित्ताने कोल्हापूरचा बोलबाला संपूर्ण राज्यात सुरू झाला आहे. राज्यसभेसाठी मतदान होण्यापूर्वीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली.
विधान परिषदेसाठी काँग्रेस चंद्रकांत हंडोरे या मूळच्या कोल्हापूरच्या सुपुत्राला उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे मुंबईचे महापौर होते. त्यांनी सामाजिक न्यायमंत्रिपद भूषविले आहे. हंडोरे हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील मसूदमाले येथील आहेत. संभाजीराजे, संजय पवार, धनंजय महाडिक आणि आता चंद्रकांत हंडोरे यांच्यामुळे कोल्हापूरची चर्चा राज्यभर होत आहे. कोल्हापूर राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर, हसन मुश्रीफ असे पाच मंत्री होते. सध्याच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर असे तीन मंत्री आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कोल्हापूरचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे.