‘देवराई’तून निसर्ग जतन, संवर्धनाचा संदेश..!

‘देवराई’तून निसर्ग जतन, संवर्धनाचा संदेश..!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दै. 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशच्या वतीने राधानगरीमधील पडसाळी येथील जुगाई देवी व दाजीपूर येथील उगवाईदेवी परिसरातील 'देवराई'वर माहितीपट तयार केला. किर्लोस्कर व वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'देवराई' माहितीपटाचे सादरीकरण हे कालौघात नष्ट होत चाललेली जुनी वृक्षसंपदा जतन करण्याचा व निसर्ग संवर्धनाचा अनोखा संदेश देणारे ठरले आहे.

निसर्गाचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश देण्यासाठी दरवर्षी किर्लोस्कर व वसुंधरातर्फे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जैवविविधता, जलसिंचन यासह पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश देणार्‍या विविध माहितीपटांचा या उपक्रमात सहभाग असतो. 10 मार्च रोजी सायबर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात 'देवराई' माहितीपटाचे सादरीकरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा कला, साहित्य, संस्कृतीबरोबरच स्वराज्यातून मिळालेला अनमोल ठेवा असलेल्या जैवविविधतेतून नटलेल्या 'देवराई'मुळे ओळखला जातो. जिल्ह्यात सुमारे 100 हून अधिक देवराई आहेत. मात्र, पर्यावरणाचा अनमोल ठेवा असणार्‍या देवराईकडे दुर्लक्ष होत आहे. दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनने देवराईचे महत्त्व सामान्यांना पटवून देण्यासाठी माहितीपट तयार केला. 'देवराई'त राजर्षी शाहू महाराजांच्या जल व्यवस्थापनाचा मानबिंदू राधानगरी धरण परिसर जैवविविधता, धरण स्वयंचलित दरवाजे, हत्ती महाल, दाजीपूर निसर्ग केंद्र याचीही माहिती दिली आहे.

जुगाई देवीची देवराई कसबा तारळे येथील काका आठवले वसतिगृह यांनी दत्तक घेऊन संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत. माहितीपटाची संकल्पना विक्रम रेपे, व्हिडीओ शूटिंग आणि एडिटिंग अमोल पाटील यांनी केले आहे. यासाठी वन्यजीव विभाग कोल्हापूर, पडसाळी ग्रामस्थ, केएमसी कॉलेजचे सहकार्य लाभले. यावेळी किर्लोस्करचे शरद आजगेकर, वसुंधराचे वीरेंद्रचित्राव, केएमसीचे प्राचार्य ए. व्ही. पौडमल, सचिन धुर्वे उपस्थित होते.

देवराईचे जतन काळाची गरज…

मानवाच्या निसर्गप्रती असणार्‍या श्रद्धेतून निर्मिती झालेले व देवासाठी आरक्षित असणारे आरण्य म्हणजे देवराई. राधानगरीतील देवराईमध्ये विशेषतः महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचे अस्तित्व असल्याने समृद्ध व स्वयंपूर्ण मानली जाते. फणस, आंबा या वृक्षांसोबतच रानबिब्बा, कवठ, पारजांभूळ, भेरलीमाड अशी वृक्षसंपदा देवराईमध्ये आढळते. तसेच याठिकाणी विविध औषधी वनस्पती अस्तित्वात आहेत. याचे जतन काळाची गरज बनली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news