दुर्मीळ प्रजाती दिनविशेष : सह्याद्रीतील अनेक दुर्मीळ वनौषधी नामशेष !

दुर्मीळ प्रजाती दिनविशेष : सह्याद्रीतील अनेक दुर्मीळ वनौषधी नामशेष !
Published on
Updated on

कोल्हापूर; सुनील कदम :  महाराष्ट्राच्या पश्चिम घाटमाथ्यावर पसरलेल्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये शेकडो वनौषधींचे अस्तित्व आढळून येत होते. मात्र, अलीकडे यापैकी अनेक वनौषधी दुर्मीळ किंवा जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. जंगलतोड, वनौषधींची चोरी आणि तस्करी याचा हा परिपाक आहे. मात्र, या वनौषधींचे महत्त्व विचारात घेता त्यांचे प्रयत्नपूर्वक जतन करण्याची आवश्यकता आहे.

जगभरात अस्तित्वात असलेल्या एकूण वनस्पतींपैकी जवळपास २००० प्रकारच्या वनस्पती या मानवासह वेगवेगळ्या प्राणीमात्रांच्या आजारांवर उपयुक्त म्हणून सिद्ध झालेल्या आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या १८०० वनस्पती आढळून येतात. त्यापैकी जवळपास ३१५ वनस्पती या वनौषधी असून त्यातील बहुतेक सगळ्या वनस्पतींचे अस्तित्व कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जंगलांमध्ये आढळून येत होते. मात्र, अलीकडील काही वर्षांत काळी हळद, चित्रक, अश्वगंधा, शतावरी, पारिंगा, मधुमालती, विष्णुकांत यांसह जवळपास ५० हून अधिक वनौषधी दुर्मीळ किंवा नामशेष झाल्या असल्याचे त्या भागातील नागरिकांमधून सांगितले जात आहे. काळाच्या ओघात या वनौषधींचा औषधी वापर आणि त्याबाबतची माहिती जवळपास अस्तंगत झाल्यात जमा आहे.

या पाच जिल्ह्यांच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील काही लोक पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर या वनौषधींचा औषधी आणि व्यावसायिक वापर करताना दिसतात, मात्र त्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. साधारणतः पावसाळा संपला की मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही वैदू मंडळी वेगवेगळ्या मार्गाने सह्याद्रीच्या जंगलांमध्ये दाखल होतात. जवळपास महिना-दोन महिने या लोकांचा या भागात मुक्कामच असतो. या दरम्यान ही मंडळी जंगलातून वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी गोळा करून निघून जातात. या वनस्पतींच्या शास्त्रशुध्द औषधी वापराला वेगवेगळ्या आणि शासकीय पातळीवरून चालना दिल्यास या भागात वनौषधी व्यवसायाची एक नवीन आणि फार मोठी बाजारपेठ निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुर्मिळातील दुर्मीळ लाजवंतीही धोक्यात!

संपूर्ण जगात दुर्मिळातील दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या आणि देशात केवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळून येणाऱ्या आणि माणसासारख्या दिसणाऱ्या 'लाजवंती' (स्लेंडर लॉरिस) या वन्यप्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. काळी जादू आणि अशाच काही अतार्किक कारणांसाठी याचा वापर करण्यात येतो. या तस्करीला वेळीच चाप लावला नाही तर नजीकच्या काळातच या भागातून हा दुर्मीळ वन्यप्राणी नामशेष होण्याचा धोका आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील चांदोली, राधानगरी, चंदगड, आजरा, आंबोली, दोडामार्ग भागातील घनदाट जंगलांमध्ये या प्राण्याचे अस्तित्व आढळून येते. हा प्राणी निशाचर असून प्रामुख्याने तो उंच झाडांवर राहतो. अर्धा फुटापासून ते एक फुटापर्यंत याची उंची असते तर वजन साध- रणतः दोनशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत असते. त्याचप्रमाणे साधारणतः दहा ते पंधरा वर्षांपर्यंत याचे आयुष्यमान असते. या भागात आढळणाऱ्या लाजवंतीचा रंग करडा असतो, मात्र डोळे लालभडक असतात..

प्रमुख वनौषधी आणि त्यांचा औषधी वापर !

अडुळसा : खोकला, अश्वगंधा शक्तिवर्धक, मरवा : चर्मरोग व पोटदुखी, टाकळा : अर्धशिशी, गंडमाळा, निरगुडी : वात, पाय मुरगळणे, रूई : पोटदुखी, कुष्ठरोग व न्युमोनिया, रिंगण : नागिण, पारिंगा : जखम भरणे, पानफुटी : मधुमेह, माका: केशवर्धन, आतड्याचे विकार व लिव्हर सूज, कोरफड : त्वचा व केशविकार, कडूनिंब : बहुगुणी, जास्वंद : केशवर्धक, गुंज : खोकला, मधुमालती : कुष्ठरोग, सांधेदुखी व त्वचाविकार, बेल : आतड्याचे विकार, बोर वात, पित्त आणि कफ, धोतरा : मूळव्याध व मूतखडा, तुळस : अपचन व पोटदुखी, आघाडा : अतिसार, बद्धकोष्ट, शमी : जुलाब व दमा, केवडा : डोकेदुखी व पोटदुखी, रानवांगी : दमा व पोटदुखी, कण्हेर : विंचवाचा दंश, आपटा : वात, पित्त व कफ, अर्जुनसारडा : हाडे सांधणे व जखमा भरणे, विष्णुकांत : अल्सर, कावीळ व मधुमेह, देवदार: चर्मरोग व पोटदुखी, पिंपळ : तोतरेपणा व त्वचाविकार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news