जागतिक छायाचित्र दिन विशेष : प्रत्येक छायाचित्र व्यक्‍त होतं

जागतिक छायाचित्र दिन विशेष : प्रत्येक छायाचित्र व्यक्‍त होतं

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हजार शब्दांत जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगते. छायाचित्र टिपण्याची विशिष्ट कलाशैली असून, छायाचित्रकाराच्या नजरेतून टिपलेले प्रत्येक छायाचित्र हे व्यक्‍त होत असते. आधुनिक युगात अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्र विकसित होत असल्याचे मत रविकांत सुतार व रवींद्र अष्टेकर यांनी व्यक्‍त केले.

दै. 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी विभागाच्या वतीने आयोजित 'फोटोग्राफी कलाविश्‍व – संधी व आव्हाने' विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त दै. 'पुढारी'च्या अधिकृत फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.

ई-कॉमर्सचे क्षेत्र विस्तारत असताना प्रॉडक्ट फोटोग्राफीला चालना मिळत आहे. विविध प्रकारचे इव्हेंटस्, वाईल्ड लाईफ, फोटो – जर्नालिझम अशा क्षेत्रांत फोटोग्राफी करण्याची नव्याने संधी उपलब्ध होत आहे. मोबाईलवरील हौशी फोटोग्राफी आणि कॅमेर्‍यातून काढलेला फोटो यामधील मूलभूत फरक ओळखणे गरजेचे आहे. फोटो एडिटिंगसारखे बदलते तंत्रज्ञान तसेच अत्याधुनिक कॅमेरा व इतर साधने वापरून छायाचित्रणाची कला अधिक विकसित करता येते.

कार्यक्रमात फोटोग्राफीसाठी लागणारे अत्याधुनिक कॅमेरे, लेन्सेस दाखवण्यात आले. तसेच शिक्षक, विद्यार्थी यांची सामाजिक आशयातून जनजागृती करणारी छायाचित्रे दाखवण्यात आली.

आठवणींच्या स्वरूपातील फोटो

आपण जगलेले अविस्मरणीय क्षण कॅमेर्‍यात कैद करत असतो. पुढील काळात हेच फोटो आठवणींच्या स्वरूपात आपले कायमचे सोबती बनून राहतात.

हे फोटो पाहताना जुने दिवस पुन्हा जगल्याची एक वेगळीच भावना आपल्या मनात निर्माण होते.

ज्या सर्वामुळे हे सर्व शक्य झालं, त्या छायाचित्रण कलेच्या इतिहासाला स्मरण्यासाठीच 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news