जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्ग अडकला घोषणांच्या हवेत

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्ग अडकला घोषणांच्या हवेत
Published on
Updated on

जयसिंगपूर; संतोष बामणे :  सांगली-कोल्हापूर महामार्गाबाबत आमदार, खासदार, राज्यातील मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडून नित्याने होत असलेल्या घोषणा आता हवेत विरल्याचे चित्र आहे; तर गेल्या 8 महिन्यांत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 19 कोटी रुपये खर्च करूनही महामार्ग खड्डेमय बनला आहे. हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन झाल्याने हा मार्ग पूर्ण करणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या कामाला 20 ऑक्टोबर 2012 रोजी सुरुवात झाली. हे काम 19 ऑक्टोबर 2014 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. याला 2 जानेवारी 2015 पर्यंत अशी 75 दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. हा रस्ता सांगली ते शिरोली असा एकूण 52.61 कि.मी.चा होता. मात्र प्रास्तावित टोलच्या विरोधामुळे सुप्रीम कंपनीने काम अर्धवट ठेवल्याने सांगली-कोल्हापूर महामार्गाला अवकळा निर्माण झाली.

त्यानंतर सुप्रीम कंपनीने न्यायालयात धाव घेतल्याने सर्वच काम रखडले. असे असताना पाच वर्षे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची मालिका लक्षात घेऊन तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर महामार्गात विलीन होण्यासाठी राज्य शासनाकडून तोडगा काढून याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात विलीनीकरण करण्यात यड्रावकरांना यश मिळाले होते. त्यांनतर राज्य शासनाने सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 19 कोटींचा निधी दिला होता. यातून गेल्या चार महिन्यांपूर्वी झालेले काम निकृष्ट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्या झालेल्या दुरवस्थेमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेऊन तत्काळ या महामार्गाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची गरज आहे.

साईडपट्टी गायब

सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील 52 किलोमीटरच्या परिसरात साईडपट्टी गायब झाल्या आहेत. साईडपट्टीत काटेरी झाडे, गवत आले आहे. तर कुठेच मुरुम नसल्याने सातत्याने वाहनाचा अपघात साईडपट्टीमुळे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किमान पावसाळ्यात तरी साईडपट्टीतील झाडे काढून साईडपट्ट्या उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

गावे अपघातप्रवण क्षेत्र

सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली, उदगाव टोल नाका, गावभाग, जयसिंगपूर शहर, चिपरी फाटा, चौंडेश्वरी चौक, इचलकरंजी फाटा, तमदलगे बसवन खिंड, बायपास मार्ग, निमशिरगाव गाव, हातकणंगले, मजले बाह्यवळण, अतिग्रे (इचलकरंजी व रुकडी फाटा), माले फाटा, हेरले, चोकाक, हालोडी, शिरोली येथे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने ही गावे अपघातप्रवण क्षेत्र बनली आहेत.

भूसंपादनाला मान्यता; मग कामाचा मुहूर्त कधी?

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात सांगली-कोल्हापूर महामार्ग विलीन करण्यात आला आहे. अंकलीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून उदगाव ते शिरोली या महामार्गावरील भूसंपादन रखडले आहे. खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील शिरोली-उदगावपर्यंतच्या मार्ग भूसंपादनास 4 ऑगस्ट 2022 रोजी तत्त्वत: मान्यता मिळाली होती. शिवाय येत्या दोन महिन्यांत भूसंपादनाचे काम सुरू करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, आदेश असताना प्राधिकरण विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news