

कौलव ; राजेंद्र दा. पाटील : जागतिकीकरण झाले, संगणक युग अवतरले…4-जी तंत्रज्ञानाने ग्रामीण भागाचाही चेहरामोहरा बदलला. मात्र, नव्या नवलाईत हरवून न जाता ग्रामीण भागाने प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आजही जोपासल्या आहेत. आजच्या ग्लोबल युगातही बेंदूर (बैलपोळा) सणादिवशी कर तोडण्याची परंपरा कायम आहे.
वर्षभर मानेवर कष्टाचे जोखड (जू) वाहणार्या बैलांना भूतदयेने पुजण्याचा व कृषी संस्कृतीचा सण म्हणून बेंदूर ओळखला जातो. बैलाने वर्षभर केलेल्या काबाडकष्टाच्या जोरावरच शेतकरी अन्नधान्य पिकवून सुखी संपन्न होतो. त्यामुळे बैलांना शेतकरी खरे दैवत मानतात. या दैवताची पूजा करण्याचा दिवस म्हणून बेंदूर ओळखला जातो.
कैलास पर्वतावर शंकर व पार्वती सारीपाट खेळत होते. पार्वतीने हा डाव जिंकला. मात्र, शंकराने आपण डाव जिंकल्याचा आग्रह सुरू केला. हा वाद सुटता सुटेना तेव्हा पार्वतीने साक्षीदार असलेल्या नंदीला डाव कोणी जिंकला? असे विचारले नंदीने शंकराच्या बाजूने मान हलवताच रागावलेल्या पार्वतीने मृत्युलोकी तुझ्या मानेवर जोखड बसेल व तू जन्मभर कष्ट उपसशील… अशी शापवाणी उच्चारली. तेव्हा भयभीत झालेल्या नंदीने उ:शाप मागितला. पार्वतीने उ:शाप देताना शेतकरी वर्षातील एक दिवस तुझी पूजा करून त्या दिवशी मानेवर जू ठेवणार नाहीत, असा उ:शाप दिला. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.
बेंदूर सणादिवशी पहाटेच्या प्रहरी बैलांना काऊ लावून गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यांची शिंगे रंगवून गोंडे बांधले जातात. पाठीवर झूल टाकून कपाळावर बाशिंगे बांधली जातात. त्यानंतर तूप, शेंगतेल, हळव्या अशा विविध औषधी वस्तूंचे व अंड्याचे मिश्रण पाजले जाते व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.
संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होता. ग्रामीण भागात आजही पाटीलकीची प्रथा अस्तित्वात आहे. ज्याच्याकडे पाटीलकीचा दिवा जातो. त्याच्या बैलाला कर तोडण्याचा मान असतो.
कर तोडताना सजवलेल्या बैलाला वाजतगाजत आणले जाते. पिंजराची जाड दोरी तयार करून त्यात पिंपळाची पाने ओवली जातात. अथवा अडथळ्यांची पेसाटी उभी करून यावरून बैलाला उडी मारण्यास लावली जाते. यालाच कर तोडणे असे म्हणतात.
मृगाच्या पावसादरम्यान शेतकरीवर्ग पेरण्या करून रिकामा झालेला असतो. खरीप पिकाची उगवण चांगली झालेली असते, त्यामुळे निसर्गाची सर्व बंधने कररूपाने तोडून बैल शेतकर्याला पिकांच्या नव्या समृद्धीच्या युगाकडे घेऊन जातो, अशी यामागे श्रद्धा आहे.
जिल्ह्यात केवळ 39 हजार 461 बैल!
एकेकाळी बैलजोडी ही सामान्य शेतकर्याच्या गोठ्याचे वैभव होती. मात्र, वाढते यांत्रिकीकरण व जातिवंत बैलांच्या पैदासीअभावी बैलांची संख्या कमालीची घटली आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात चार लाखांच्या आसपास असणारी बैलांची संख्या आता फक्त 39 हजार 461 एवढीच राहिली आहे. त्यामध्ये जातिवंत खिल्लारी बैलांची संख्या 21 हजार 705 एवढी घटली आहे. बैलांची घटती संख्या कृषी संस्कृतीच्या नष्ट होणार्या पाऊलखुणाच ठरण्याचा धोका आहे.