ग्रामपंचायत रणांगण निकाल : शिरोळमध्ये यड्रावकर गटासह काँग्रेसची मुसंडी

ग्रामपंचायत रणांगण निकाल : शिरोळमध्ये यड्रावकर गटासह काँग्रेसची मुसंडी
Published on
Updated on

जयसिंगपूर/शिरोळ; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी स्पष्ट झाला. यात 10 ग्रामपंचायतींमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाने सत्ता काबीज केली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस, स्वाभिमानी, भाजप व उद्धव ठाकरे गटानेही अनेक ग्रामपंचायतींत सत्ता मिळवली आहे.

10 गावांत मतदारांनी सत्ताधार्‍यांना नाकारले असून 6 गावांत सत्ताधार्‍यांना पुन्हा संधी दिली आहे. शिरोळ तालुक्यात औरवाड, कवठेसार, लाटवाडी, नवे दानवाड या गावांत सरपंच आरक्षण खुले असल्याने अत्यंत तुल्यबळ लढली झाल्या. खुल्या महिल्या गटात अब्दुललाट, टाकवडे, अकिवाट, शिवनाकवाडी, उमळवाड, खिद्रापूर, तर अनुसूचित जाती महिलामध्ये हेरवाड, राजापूर व अनुसुचित जाती संभाजीपूर, चिंचवाड, तसेच ना.मा.प्रवर्गासाठी कनवाड, हरोली या गावांचा समावेश आहे. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या राजापूरवाडी अशा 17 गावांत अटतटीच्या लढती झाल्या. यड्रावकर गट, स्वाभिमानी, काँग्रेस, भाजप, उदद्धव ठाकरे शिवसेना, आवाडे गट, वंचित आघाडी यासह अन्य पक्षांनी या निवडणुकीत विविध आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती.

सरपंच व सदस्यासाठी 498 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 17 गावांत विविध पक्षांनी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले होते. यात अटीतटीच्या लढती झाल्या होत्या. अखेर मंगळवारी निकालात 10 गावांत सत्तांतर झाले. सहा गावांत सत्ताधार्‍यांना संधी मिळाली. राजापूरवाडी येथे त्रिशंकू स्थिती झाली आहे. यड्रावकर गटाने 10 गावांत, काँग्रेसने 9 गावांत, स्वाभिमानी 7 गावांत, भाजपने 6 गावांत, उद्धव ठाकरे शिवसेनेने 4 गावांत बहुमत मिळवले आहे.

ठोमकेंचे सर्वाधिक मताधिक्य

राजापूर येथील सरंपचपदाचे उमेदवार गीता दिवटे यांना 1,274 तर विरोध उमेदवार सविता कट्टी यांना 1,271 मतदान मिळाले. यात गीता दिवटे अवघ्या 3 मतांनी विजयी झाल्या. चिंचवाड येथील विजय ऊर्फ जालिंदर ठोमके यांना 1,883 तर विरोधी उमेदवार पुडलिंक ठोमके 378, तसेच वैभव कांबळे 295 मते मिळाली. यात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 1506 मते घेऊन जालिंदर ठोमके विजयी झाले.

लोकप्रतिनिधींचा दावा असा…

यड्रावकर गटाने स्थानिक आघाड्यांशी युती करून 10 गावांत सरपंच निवडून आणण्यात यश मिळविले असल्याचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे. 12 गावांत महाविकास आघाडीने बहुमत मिळविल्याचे काँग्रेसचे शेखर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. भाजपने 4 गावांत बहुमत व 5 सरपंचपदे मिळवून अनेक गावांत स्थानिक आघाडीचे सदस्य निवडून आणले असल्याचा दावा भाजपचे पृथ्वीराज यादव यांनी केला.

शिरोळ तालुक्यातील सतरा गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी विकासकामाला महत्त्व दिल्याचे या निकालावरून स्पष्ट होते. मंत्रिपद आणि आमदारकीच्या मागील दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा निधी आपण आणून गट-तट, पक्षभेद, जात-पात न पाहता तालुक्यातल्या प्रत्येक गावाला योग्य प्रमाणात निधी देऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
– आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

पक्षीय बलाबल

यड्रावकर गट – 10
काँग्रेस – 9
स्वाभिमानी – 7
भाजप – 6
ठाकरे सेना – 4

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news