ग्रामपंचायत रणांगण निकाल : गडहिंग्लजमध्ये स्थानिक आघाड्यांची सरशी; चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का

ग्रामपंचायत रणांगण निकाल : गडहिंग्लजमध्ये स्थानिक आघाड्यांची सरशी; चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का
Published on
Updated on

गडहिंग्लज; प्रवीण आजगेकर : गडहिंग्लज तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांची सरशी झाली असून, चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. तर कागल मतदारसंघातील कडगाव जि. प. मतदारसंघात कडगाव, जखेवाडी, बेकनाळ गावातील सत्ता भाजपकडून हिसकावून घेत मुश्रीफांनी बाजी मारली. भाजपकडून या तिन्ही ग्रामपंचायतींसह नेसरी, हसूरवाडी, येणेचवंडी व अन्य तीन ग्रामपंचायती ताब्यातून गेल्या आहेत. जनता दलाला शहरालगतच्या बड्याचीवाडीवरील वर्चस्व ठेवता आले नसल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक आघाड्यांमध्ये जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील गटाने महागावसारख्या मोठ्या गावातील ग्रामपंचायती दहा वर्षांनी जिंकली असून, हसूरवाडी येथील ग्रामपंचायतीवरही सत्ता मिळविली आहे. शहरालगत असलेली भडगाव ग्रामपंचायत ही गोडसाखर उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या साथीने जिंकली असल्याने अप्पी पाटील गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

चंदगडचे आ. राजेश पाटील यांच्या हातातून काही ग्रामपंचायती निसटल्या असून, त्यांनाही आगामी काळात याचा विचार करावा लागणार आहे. भडगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना या ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुगळी येथे मुश्रीफांना मानणार्‍या कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. याशिवाय काळामवाडी, डोणेवाडी, बिद्रेवाडी, तारेवाडी, कुमरी या ठिकाणच्या मताचाही फटका बसला आहे.

तालुक्यात स्थानिक विकास आघाड्यांना चांगलेच महत्त्व आले असून, अनेक ठिकाणी गोडसाखरच्या पार्श्वभूमीवर काहींनी समविचारी आघाडी करत विजयाचे गणित जुळवले होते. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक विकास आघाड्यांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी काही नवख्या उमेदवारांनी मातब्बरांना धूळ चारल्याचे दिसत आहे.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये शिवसेनेच्या फुटीचा फटका एकीकडे बसलेला असताना उद्धव ठाकरेच्या शिवसेना गटाचे शिलेदार रियाज शमणजी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसर्‍या गटाच्या नेतृत्वाची अदयाप कस दिसून यायचा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचा फारसा सहभाग कुठेही दिसून आला नाही त्यामुळे गटातटाचे राजकारण गावांमध्ये दिसून आले असले तरी प्रत्यक्षात पक्षीय बंधने मात्र फारशी नाहीत.

जि.प.साठी काहींना फटका, काहींची जोडणी

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कडगाव, भडगाव, नेसरी, महागाव, हलकर्णी ही गावे निर्णायक ठरतात. कडगावमध्ये राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून, भडगाव राष्ट्रवादीकडून निसटले आहे. नेसरी भाजपकडून निसटले असून, महागाव राष्ट्रवादी निसटले आहे. यामुळे याचा काहींना फटका बसला असून, काहींची यामुळे नवी जोडणी होणार आहे.

सरपंच पदाचे राजकीय बलाबल

राष्ट्रवादी………………..8
काँग्रेस…………………1
भाजप…………………..5
शिवसेना शिंदे गट…………0
शिवसेना ठाकरे गट………..1
स्थानिक आघाडी…………15
एकूण सरपंच………….30

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news