

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका बुधवारी जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदासाठीही मतदान होणार असल्याने या निवडणुका अधिकच चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट आहे. गटा-तटासह पक्षांच्या राजकीय अस्तित्वासाठी स्थानिक पातळीवर नेत्यांना या निवडणुकीत कंबर कसावी लागणार आहे. बदललेली राजकीय समीकरणे, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील असणार्या अनेक गावांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरालगत प्रमुख सर्वच गावांत ही निवडणूक होत आहे. राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक 64 ग्रामपंचायतींची, तर शिरोळ तालुक्यातील सर्वात कमी 17 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. कोल्हापूर शहरालगतच असलेल्या वडणगे, आंबेवाडी, शिंगणापूर, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव, गांधीनगर, वळिवडे, शिरोली पुलाची या गावांत निवडणुका होत आहेत. कोल्हापूर शहर आणि या निवडणुका होत असलेल्या गावांची हद्द यामध्ये फारसा फरक नसल्याने या निवडणुकांचे वातावरण कोल्हापूर शहरातही दिसणार आहे.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. त्याद़ृष्टीनेही काही ठिकाणी आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कमालीचा सत्ता संघर्ष होईल. त्यातून टोकाला जाणारी ईर्ष्याही पाहायला मिळेल, अशीही शक्यता आहे.