

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शहा हे रविवारी (दि. 19) कोल्हापूर दौर्यावर येणार आहेत. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते अभिवादन करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पुतळे उंच असल्याने याठिकाणी पायर्या तयार केल्या आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुतळ्याशेजारी सुरक्षित पायर्या तयार केल्या आहेत. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यंवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
मंत्री अमित शहा यांच्या दौर्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. शहा यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच पक्ष कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्या गणेश मंदिराचा पायाभरणी समारंभ होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने ठिकठिकाणी शहा यांचे स्वागत करणार्या स्वागत कमानी उभारल्या आहेत. स्वागत फलकही उभारण्यात आले आहेत. सर्वत्र भाजपमय वातावरण झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवातच यानिमित्ताने कोल्हापुरातून होणार आहे.
दुपारी 1.30 : पुण्याहून कोल्हापूर विमानतळावर आगमन. दुपारी 1.45 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन. दुपारी 2.40 : दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण, अभिवादन. दुपारी 2.40 ते 3 : राखीव. दुपारी 3.15 : न्यू एज्युकेशन सोसायटी कार्यक्रमास उपस्थिती, पेटाळा मैदान. सायं. 5 : गणेश मंदिर कलश पूजन सोहळा, नूतन भाजप कार्यालय. 5.15 : लोकसभा विजयी संकल्प रॅली, कार्यकर्ता मेळावा, राजहंस प्रेससमोर. 7 ते 8 : राखीव. रात्री 8.30 : भाजपाच्या प्रमुख 150 कार्यकर्त्यांची बैठक. 9.30 : कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना.