कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : रमणमळा परिसरात बुधवारी (दि.9) दर्शन झालेला गव्यांचा कळप आज सहाव्या दिवशीही सोमवारी (दि.14) रमणमळा परिसरातच आढळून आला. यामुळे गव्यांना कोल्हापूर सोडवेना की काय, अशी म्हणण्याची वेळ वनखात्यावरही आली आहे. गवे आल्या मार्गाने परत जावे, याकरिता वन विभागाची गस्त आजही कायम आहे.
पाच मध्यम वाढीचे आणि एका लहान पिल्लाचा समावेश असलेल्या सहा गव्यांचा कळप न्यू पॅलेस, पोलो मैदान परिसरातील शेतात ठाण मांडून आहे. नैसर्गिक अधिवास सोडून आलेला गवा एका ठिकाणी एक-दोन दिवसच राहतो. मात्र, या कळपाची बात वेगळीच आहे. गेल्या सहा दिवसांपासून एकाच ठिकाणी हा कळप संचार करत आहे. मात्र, त्यांचा वावर दिवसेंदिवस वन विभागासह स्थानिक शेतकरी आणि नागरिकांसाठी चिंताजनक बनत चालला आहे.
दोन वेळा वडणगे-निगवेच्या दिशेने जाणारे गवे पुन्हा रमणमळा परिसरात परतले. शनिवारी रात्री नंतर रविवारी दिवसभर त्यांचा वावर आढळून आला नाही. परिसरात तसेच वन विभागाच्या कर्मचार्यांनाही त्याचे दर्शन झाले नाही. यामुळे गवे परतले असावेत अंदाज व्यक्त केला जात होता. आज दिवसभर गव्यांचा कोठेही मागमूस दिसत नव्हता. यामुळे गव्यांच्या परतण्याचीची शक्यता अधिक होती. मात्र, गव्यांचा जिथे वावर होता, त्याच्या जवळपास गव्यांचे नवे पद्मार्क (पायांचे ठसे) अथवा विष्ठा आढळून आली नाही.
यासर्व पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री गव्यांच्या वावर असलेल्या परिसरात पाहणी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रात्री सव्वा आठच्या सुमारास वनपाल विजय पाटील, रेस्क्यू फोर्सचे प्रदीप सुतार, मानद वन्यजीव रक्षक स्वप्निल पोवार आदींसह वन विभागाचे पथक काही अंतर आत गेले. यावेळी पोवार मळा ते विलास पोवार यांच्या शेतादरम्यान असणार्या गवतांच्या कुरणात गव्यांचा कळप आढळून आला. यामुळे आज दिवसभर व्यक्त केलेल्या शक्यता फोल ठरल्या. गवे या परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने पुन्हा गस्त वाढवली.
या परिसरात जनावारांसाठी गवतांसाठी शेत मोकळे ठेवले आहे. याठिकाणी हिरवेगार गवत आहे, त्याचबरोबर पाण्याचा हौदही आहे. याच गवताच्या शेतात मोठ्या आणि खोल चरीही आहेत. यामुळे या चरीत गवे बसत असल्याने ते गवतातून दिसत नसावे असे वन विभागाकडून सांगण्यात आले. आज पुन्हा प्रत्यक्ष गव्यांचे दर्शन झाल्याने गस्त वाढवण्यात आली. गवे त्यांच्या अधिवासाच्या दिशेने हुसकावण्यासाठी अन्य पर्यायाचा अवलंब सध्या केला जाणार नाही; अन्यथा हे गवे बिथरण्याचा, कळपातून वेगवेगळे होण्याचा तसेच नागरी वस्तीत शिरण्याचाही धोका आहे. यामुळे गस्त वाढवून, त्यांना नागरी वस्तीत न येऊ देणे आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून त्यांना परतीच्या मार्गाने जाण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.