कोल्हापूर ; सागर यादव : दोन वर्षांनंतर जनजीवन पूर्वपदावर आल्याने गावोगावी जत्रा-यात्रा सुरू झाल्या आहेत. ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने यात्रेतील कुस्ती मैदाने रंगू लागली आहेत. याउलट निव्वळ कुस्ती स्पर्धांच्या आयोजनासाठी निर्माण केलेल्या राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान मात्र गवतासह झाडाझुडपांनी व्यापले आहे. यामुळे 'जत्रेत कुस्तीचा फड अन् खासबागेत गवत' अशी अवस्था झाली आहे.
कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रही खुले झाले आहे. फुटबॉल, क्रिकेटप्रमाणेच कुस्तीचे प्रशिक्षण, जत्रा-यात्रांच्या निमित्ताने कुस्तीची छोटी-मोठी मैदाने जिल्ह्यासह राज्यभर सूरू झाली आहेत. मात्र खासबाग कुस्ती मैदान अद्याप कुलूपबंदच आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे. तालीम संघाने पुढाकार घेऊन खासबाग कुस्ती मैदानाचे पावित्र्य जपण्याची गरज आहे.
वारसास्थळाला अवक
खासबाग मैदानाभोवती अतिक्रमण वाढल्याने वारसास्थळांच्या यादीत असणार्या मैदानाला अवकळा आली आहे. मैदानाच्या तटबंदीखाली कचर्याचे ढीग, सभोवती विविध बांधकामे झाली आहेत. मिरजकर तिकटीकडील मुख्य प्रवेशद्वार तर शोधावे लागते. येथे अनेक अवैध धंदे सुरू असतात. एरव्ही पैलवान व कुस्तीप्रेमी जेथे नतमस्तक होऊन मैदानात येतात, त्या मुख्य प्रवेशद्वारातील पायर्यांना स्वच्छतागृहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे खासबागचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे खुले करावे, अशी मागणी होत आहे.
झाडे-झुडपे अन् दारूच्या बाटल्या
खासबाग मैदान बंद असल्याने मैदानात उंच गवत, काटेरी वनस्पती, झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुरक्षिततेची यंत्रणा नसल्याने दारूच्या बाटल्या, सिगारेट, गुटखा-मावा यासह तत्सम कचर्याचे ढीग जागोजागी साठलेले दिसतात.