

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. गणेश लोहार यांनी केले. ते दै. 'पुढारी' आयोजित एज्युदिशा या प्रदर्शनात 'कौशल्यावर आधारित करिअर संधी' या विषयावर बोलत होते.
कौशल्य विकास प्रशिक्षण हे आजच्या गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात यशाची किल्लीच असून ते वाढणार्या बेरोजगारीचा दर कमी करून विविध उद्योगातील मागणी बघता नोकर्या मिळवून देण्यात अग्रेसर आहेत. यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहेत. शैक्षणिक पात्रतेसह, योग्यता आणि कौशल्ये यांच्याकडे रोजगार क्षमतेच्या द़ृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचे लोहार म्हणाले.
आजची तरुणाई मोबाईल, सोशल मीडियावर आपला स्टेट्स सतत बदलत असते. खरं तर यामागे वेळ घालवण्यापेक्षा आयुष्याचा स्टेट्स बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मुलांना आतापासूनच ऑनलाईनवरून ऑफलाईनवर येत आपल्यातील कौशल्यांचा विकास करायला हवा. शैक्षणिक वयापासून काळाची पावले ओळखत पाच वर्षांनंतर नोकरी मिळवण्यासाठीची किती स्पर्धा असेल याचा अंदाज घेत शिक्षणाचा योग्य पद्धतीने अवलंब केला तर अशक्य असे काहीच नाही, असे मत लोहार यांनी व्यक्त केले.