कोल्हापूरच्या निवृत्ती चौकात नाचवल्या नंग्या तलवारी

file photo
file photo

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : कोल्हापुरातील काही गावगुंडांनी शहराच्या मध्यवर्ती निवृत्ती चौकामध्ये नंग्या तलवारी नाचविल्या. वाढदिवसाचे पोस्टर फाडल्याच्या कारणावरून पाच तरुणांनी नंग्या तलवारीने दोन तरुणांवर हल्ला केला आणि परिसरामध्ये दहशत माजविली. यामुळे शहरात विशेषतः उपनगरांमध्ये चौकाचौकांत दहशत माजविणार्‍या या गावगुंडांच्या मुसक्या बांधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिस खात्याने या गावगुंडांना आपला खाक्या दाखविला, तर कोल्हापूर शहरावर पसरलेली ही अनामिक दहशत संपुष्टात येऊ शकते; अन्यथा ही पिलावळ कोल्हापूरच्या आदर्श समाज जीवनाच्या मुळावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापुरात अलीकडे तलवारींची खुमखुमी वाढली आहे. नुसते एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून तरुणांच्या टोळ्या समोरासमोर भिडतात. फुटबॉलची मॅच असेल, तर सच्च्या फुटबॉलशौकिनांना दंगलीच्या भीतीने खेळ पाहण्यासाठी जाणे मुश्कील होऊन बसले आहे. कधी हप्ते वसुलीच्या नावाने तलवारी बाहेर येतात, कधी वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने चौकामध्ये तलवारीने केक कापण्याचे कार्यक्रम होतात, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि राज्य सरकारने कायदा केला, तरीही रात्री उशिरापर्यंत चौकाचौकांत डॉल्बीचा धिंगाणा काही संपत नाही. शहरातील मैदाने सायंकाळी ओपन बार आणि गर्दुल्यांची ठिकाणे बनताहेत. ही सगळी वाहत गेलेली आणि हवेत तरंगणारी पिढी आवरण्याचे मोठे काम पोलिस खात्यापुढे आहे. त्याला सक्षम नेतृत्वाची जोड मिळाली, तर रस्त्यावर तलवारी नाचवणारी ही भुते सुतासारखी सरळ होऊ शकतात; पण त्यासाठी धैर्य हवे आणि कनिष्ठ अधिकार्‍यांना पाठबळ हवे.

कोल्हापुरात वीस एक वर्षांपूर्वी पेठांचा दबदबा होता. गावठाणामध्ये असलेल्या पेठांचे वैमनस्य टोकाचे होते. आता पेठा शांत झाल्या. अत्यंत शांततेचा भाग म्हणून पेठांकडे पाहिले जाते; पण शहराची उपनगरे मात्र भडकली आहेत. दांडगाईवाडीपासून पाचगावच्या माळापर्यंत शहराच्या सभोवताली अनेक उपनगरीय वस्त्यांमध्ये कमालीची अशांतता आहे.

काही ठिकाणी गुंडांचे अड्डे तयार झाले आहेत. या गुंडांना तलवारी काढणे, हवेत गोळीबार करणे याचे काहीच वाटत नाही. या दहशतीच्या जोरावर कोल्हापुरातील कष्टकर्‍यांच्या अनेक व्यवसायांना फाळकूटगिरीचे लेबल चिकटविण्यात हे गावगुंड यशस्वी झाले आहेत. त्यांना कोणाचे पाठबळ आहे? कोणाच्या जीवावर त्यांची ही दादागिरी चालली आहे, याचा शोध घेतला, तर त्याचे मूळ कोठे आहे, याचा शोध लागू शकतो. त्यासाठी धैर्य दाखविण्याची तयारी आवश्यक आहे.

वैमनस्याच्या धगीमध्ये सामाजिक आपुलकी जळून खाक

कोल्हापुरात दिवसाढवळ्या कशा तलवारी नाचतात? तलवारी नाचविणार्‍यांच्या हातामध्ये कोणत्या नेत्यांचे झेंडे असतात? आणि संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, की कोणाचे फोन जातात, याचा शोध सध्या आवश्यक बनला आहे. कारण, कार्यकर्त्यांऐवजी गुंडांना खुराक आणि पाठबळ देऊन आपली बैठक भक्कम करण्याची नवी राजकीय संस्कृती गेल्या वीस एक वर्षांत कोल्हापुरात जोमाने रुजत आहे. यामध्ये एकमेकांची डोकी फोडल्याने प्रतिस्पर्धी गटातील अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. वैमनस्याच्या धगीमध्ये सामाजिक आपुलकी जळून खाक झाली आहे. हा इतिहास पुसून टाकायचा असेल, तर पोलिसांना कंबर कसावी लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news