

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : साईराज स्पोर्टस् फाऊंडेशन आयोजित निमंत्रितांच्या अखिल भारतीय आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत रविवारी पीटीएम कोल्हापूर संघाने अलफतेह मुंबई संघावर 1-0 अशी मात करत साईराज चषक पटकावला.
सकाळी पहिल्या उपांत्य सामन्यात अलफतेह मुंबई संघाने एसआरएस गोवा पोलिस संघाचा 1-0 असा पराभव केला. मुंबईच्या असिफ शेख याने पहिल्या सत्रात 49 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. गोवा संघाला अखेरपर्यंत गोल करण्यात यश न आल्याने मुंबई संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसर्या उपांत्य सामन्यात पीटीएम कोल्हापूर संघाने बुफा इलिट संघाचा 2-1 असा पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक बनलेल्या पीटीएमच्या प्रतीक बदामे याने पहिला गोल 15 व्या मिनिटाला नोंदवला. 22 व्या मिनिटाला पीटीएमच्या ओमकार मोरे याने गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 28 व्या मिनिटाला बुफाच्या कौस्तुभ गेनजी याने गोल केला. मात्र पुढच्या खेळीत बुफा संघाला गोल करण्यात यश मिळाले नाही.
पीटीएम वि. अलफतेह यांच्यात अंतिम सामना चार वाजता सुरू झाला. दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेऊनही पूर्वार्धात गोल करण्यात अपयश आले. उत्तरार्धात दहाव्या मिनिटाला पीटीएम संघाच्या कैलास पाटील याने दिलेल्या पासवर ओमकार मोरे याने रोमहर्षक गोल नोंदवला. पीटीएम आणि मुंबई संघाने गोल करण्याच्या काही संधी दवडल्या. सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉलशौकीन उपस्थित होते.
बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अभय पाटील, राजेश जाधव, महेश फगरे, रोहित फगरे, राहुल फगरे, जॅकी मस्नरनेस, विठ्ठल गवस, शीतल पाटील उपस्थित होते. विजेत्या पीटीएम कोल्हापूर संघाला आकर्षक चषक व 75 हजार रुपये तर उपविजेत्या संघाला चषक व 50 हजार रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वैयक्तिक कामगिरीचा सन्मान
साईराज चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यातील सामनावीर बहुमान ओमकार मोरे (पीटीएम), उत्कृष्ट गोलकीपर उमेद रावत (अलफतेह), उत्कृष्ट बचाव तुषार देसाई (एसआरएस गोवा), उत्कृष्ट मध्यरक्षक कैलास पाटील (पीटीएम), उत्कृष्ट फॉरवर्ड ऋ षिकेश मेहते
(पीटीएम), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून दर्शन युनायटेड एफसी, सर्वाधिक गोल अन्सारी (अल फतेह), मालिकावीर म्हणून ओमकार मोरे (पीटीएम) यांना सन्मानित करण्यात आले.