

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरु करताना विजेचा धक्का बसून साबळेवाडी (ता. करवीर) येथील अरुण आनंदा वरपे (वय ४०) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
दोनवडे फाट्याजवळील वरपे माळ येथे अरुण वरपे हे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घराजवळच त्यांचे शेत व विहीर आहे. या विहिरीचे पाणी ते घरी पिण्यासाठी वापरतात. सकाळी 7 वाजता विहिरीवरील मोटारपंप चालू करण्यासाठी ते गेले होते; पण घरी लवकर न आल्याने घराच्यांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा विहिरीजवळ वरपे मृतावस्थेत आढळले. मुसळधार पावसामुळे पंपाच्या पेटीत विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला स्पर्श होताच विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.