कोल्हापूर : सर्व दुकाने आजपासून सुरू

कोल्हापूर
कोल्हापूर
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर : सर्व दुकाने आजपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर कमी झाल्याने सर्वच व्यापार सोमवारपासून (दि. 19) सकाळी 7 पासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

तीन महिने बंद असणारे व्यवसाय सुरू होत असल्याने व्यापार्‍यांत उत्साह संचारला असून, बाजारपेठांमध्ये चैतन्य आले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी पेठांमध्ये दुकाने सुरू करण्यासाठी लगबग सुरू आहे.

कोरोना संसर्ग वाढल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या वर गेला होता. त्यामुळे तीन महिने सर्वच व्यापार बंद होता. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापार्‍यांसह दुकानांत काम करणार्‍या कामगारांचीही दयनीय अवस्था होती. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करून व्यापार्‍यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला होता.

दरम्यान, गत आठवड्याची आकडेवारी पाहता पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला. त्यामुळे आता सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात समाधान पसरले आहे. लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, शिवाजी रोड, राजारामपुरी, शाहूपुरी आदी प्रमुख बाजारपेठांत दुकाने सुरू करण्यासाठी स्वच्छतेची लगबग सुरू होती.

कोरोना पॉझिटिव्हिटी सरासरी रेट दहा टक्क्यांच्या आत आल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा आता तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच दुकाने सोमवारपासून सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनप्रमुख, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी सायंकाळी काढले.

आठ दिवसांतील जिल्ह्यातील आरटी-पीसीआर चाचणीचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या आतअसून, दुकाने सुरू करा; अन्यथा सोमवारपासून परवानगीशिवाय दुकाने सुरू करण्याचा इशारा व्यापार्‍यांनी दिला होता. शनिवारी जिल्हा प्रशासनाने आदेश काढत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या आदेशानुसार सोमवारी सर्व दुकाने सुरू होणार आहेत.

सर्वच दुकाने सुरू होणार असल्याने तीन महिने कुलूपबंद असणार्‍या दुकानांचे शटर आता उघडणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुकाने सुरू केली होती. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने पुन्हा दुकाने बंद करण्यात आली होती. आता जिल्हा तिसर्‍या टप्प्यात आल्याने सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेटचा आढावा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनतर्फे गुरुवार ते शुक्रवार या आठ दिवसांतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेटचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या वर गेल्यास जिल्हा पुन्हा चौथ्या टप्प्यात जाऊन सर्व दुकाने पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या आत कायम राहिल्यास सर्व दुकाने सुरू राहतील. यासाठी स्वतंत्र आदेशाची गरज भासणार नाही.

सायंकाळी पाच ते पहाटे पाच या वेळेत जमावबंदी आदेश

सोमवारपासून (दि. 19) सर्व दुकाने सुरू होत असली, तरी जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.

…हे सुरू राहणार

सराफी दुकाने, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल दुकाने, चप्पल दुकाने, इंटरनेट कॅफे, स्टेशनरी

रेडीमेड कापड दुकाने, साडी, गारमेंट

स्मॉल्स (मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन बंद राहणार)

हॉटेल, रेस्टॉरंटस् पार्सल सेवेला परवानगी (सर्व दिवशी)

सार्वजनिक मैदाने, फिरणे, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
चित्रीकरणास परवानगी सकाळी 7 ते दुपारी 4

लग्न समारंभास जास्तीत जास्त 25 लोकांची उपस्थिती

व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के आसन क्षमतेसह

…हे बंद राहणार

हॉटेल, रेस्टॉरंटस्मध्ये बसून जेवण, नाश्ता नाही

राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर बंदी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news