

इचलकरंजी, संदीप बिडकर : शिंदे-भाजप सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावागावांमध्ये सरपंचपदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्याच गटाचा सरपंच असावा, असे प्रयत्न सर्वच गटनेते करताना आढळून येत आहेत. त्यामुळे सरपंचपदाचा उमेदवार 'दमदार'च हवा यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कागदपत्रे जमा करून अर्ज भरण्याच्या कामांना वेग आला आहे. 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्यामुळे उमेदवारांसह नेत्यांची पळापळ सुरू आहे.
सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये ज्या व्यक्तीचा जास्त जनसंपर्क आहे. असा उमेदवार निवडण्यासाठी गटनेत्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. तसेच बंडखोरी रोखण्यासाठी अनेकांचे डमी अर्ज भरून त्यांना आश्वासनावर ठेवण्याची खेळीही काही गटनेते करताना दिसत आहेत.
अंतिम क्षणापर्यंत गटाला कोणताही धोका होऊ नये याची दक्षता सर्वजण घेत असल्यामुळे अनेक गावांमध्ये रंगतदार चित्र निर्माण झाले आहे. पारंपरिक आघाड्यांबरोबरच तरुणांच्या गटाने नवीन आघाड्यांची बांधणी सुरू केल्याचे चित्रही अनेक गावांत पाहावयास मिळत आहे. परिणामी तरुणांच्या आक्रमकपणामुळे गावातील सत्ताधारी व विरोधक गट सावध चाली रचत आहे.
करवीरमध्ये कांटे की टक्कर
सधन तालुका म्हणून ओळखण्यात येणार्या करवीर तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे. करवीर तालुक्यातील 36 गावे दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. या मतदारसंघात थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत दिसत असली तरी ही लढत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील व महाडिक गटातच होणार आहे. राहिलेली गावे करवीर विधानसभा मतदारसंघात येतात. या गावांमध्ये काँग्रेसचे आ. पी. एन. पाटील व माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यात लढत होणार आहे.
सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर
निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेकांनी आपल्या आघाडीचा प्रचार करण्यासाठी प्रमुख तरुण
मंडळांच्या कार्यकर्त्यांचे व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करून योग्य तो मेसेज सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कामही सुरू केले आहे. तसेच ग्रामीण भागात उमेदवारी भरल्यापासूनच जेवणावळींना सुरुवात झाल्यामुळे ढाबे, हॉटेल आतापासूनच हाऊसफुल्ल होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.