

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली जाते. या अंतर्गत जिल्हा प्रशासानातर्फे 'समता दिंडी'चे आयोजन करण्यात आले होते. समतेची शिकवण देत सर्व जाती-धर्मीयांची एकजूट करणार्या लोकराजाचा अखंड जयघोष करत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी भरपावसात राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा केला.
राजर्षींच्या स्मारकास अभिवादनाने दिंडीस प्रारंभ
दसरा चौकातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आणि झेंडा दाखवून समता दिंडीचा प्रारंभ शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून सजीव देखावा सादर करण्यात आला. कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती, फुटबॉलसह इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडित वेषभूषा करून दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
कला पथकांसह ऐतिहासिक वेशभूषाही
दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी व्हीनस कॉर्नर, आईसाहेब महाराजांचा पुतळामार्गे बिंदू चौकापर्यंत नेण्यात आली. तेथे दिंडीचा समारोप झाला. समता दिंडीमध्ये कोल्हापूर शहरातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा व शालेय गणवेशासह सहभाग घेतला. याशिवाय राजर्षींच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ, ढोलताशा, लेझीम व झांजपथक, मर्दानी खेळ आदी पथके, एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेत सहभागी मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
समता दिंडीत सहभागी शाळा
समता दिंडीत देशभूषण हायस्कूल, नेहरू हायस्कूल, साई हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, नूतन मराठी विद्यालय, म.ल.ग. हायस्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, एस्तेर पॅटन हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल जुना बुधवार, छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस, महाराष्ट्र हायस्कूल, न्यू हायस्कूल, पद्माराजे विद्यालय, एस. एम. लोहिया हायस्कूल या शाळांचा सहभाग होता. यातील महाराष्ट्र हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, नेहरू हायस्कूल व साई हायस्कूल, करवीर प्रशाला विक्रमनगरच्या विद्यार्थ्यांनी चित्ररथ, झांज-लेझीम पथकांसह सहभाग नोंदविला.