कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) चे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कोल्हापुरात 76 व्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या ग्रुप 4 मधील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी केएसए तर्फे छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज करण्यात आले आहे. संतोष ट्रॉफी स्पर्धेतील साखळी (लीग) सामने कोल्हापुरात प्रथमच होणार असून दि. 7 ते 15 जानेवारी या काळात 15 सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.
वेस्ट बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमन व दादरा, हरियाणा या संघांचे सामने कोल्हापुरात होणार आहेत. स्पर्धेसाठी छत्रपती शाहू छत्रपती स्टेडियममधील मैदान अद्ययावत करण्यात आले असून आधुनिक तंत्रज्ञान वापरून मैदानावर हिरवळ आणण्यात आली आहे. याशिवाय चेंजिंग रूम्ससह आधुनिक सुविधाही उपलब्ध केल्या आहेत.
संतोष ट्रॉफी ग्रुप 4 च्या लीग सामन्यांचे उद्घाटन शनिवारी (दि. 7 जानेवारी) दुपारी साडेतीन वाजता, शाहू महाराज यांच्या हस्ते होईल. यावेळी संभाजीराजे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य मालोजीराजे, 'विफा'च्या महिला समिती अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी मोफत खुली आहे.
दमन- दादरा विरुद्ध छत्तीसगड : सकाळी साडेआठ वाजता
हरियाणा विरुद्ध पश्चिम बंगाल : सकाळी साडेअकरा वाजता
मध्य प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र : दुपारी साडेतीन वाजता