कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघावर अशासकीय मंडळ

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघावर अशासकीय मंडळ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शेतकरी सहकारी संघाच्या अशासकीय प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या अध्यक्षपदी संघाचे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर सदस्य म्हणून माजी कार्यकारी संचालक अजित मोहिते (यळगूड) व जयवंत पाटील (कुरुकली, ता. कागल) यांची नियुक्ती केली आहे. याबाबत सहकार विभागाने मंगळवारी आदेश काढले.
यानंतर मंडळाने रात्रीच संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात जाऊन कार्यभार स्वीकारला. या निर्णयामुळे संघाची मॅग्नेट बझारची जागा संघाच्या ताब्यात घेण्यासाठी आता प्राधिकृत मंडळाला पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे.

संचालक मंडळ बरखास्त करून 14 जुलै 2021 रोजी संघावर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांचे प्रशासक मंडळ नियुक्त झाले. गेल्या सव्वा वर्षात या मंडळाने संघाचा 1 कोटी 45 लाखांनी खर्च कमी करून तोटा भरून काढला. संघाच्या पैशातून संचालकांनी कुटुंबाचा विमा उतरला होता. ते 3.51 लाख रुपये वसूल केले. प्रवास खर्चात 4.70 लाखांची बचत केली. 40 शाखा नफ्यात आणून संघाला बळ दिले. कडगाव (ता. भुदरगड) येथे संघाची शाखा सुरू केली. बिद्री (ता. कागल) येथे नवीन शेतकरी बझार सुरू केला. चंदगड आणि कोवाड येथील बझारच्या जागेचे नूतनीकरण केले. खताचा व्यवसाय वाढवून संघाला नफा मिळवून दिला.

मॅग्नेटची जागा ताब्यात घेण्यासाठी ठराव

संघाच्या भवानी मंडप येथील मुख्यालयातील तळमजल्याची जागा मुंबईतील होम केअर रिटेल मार्ट, लि. (मॅग्नेट) या कंपनीच्या ताब्यात आहे. ही जागा तडजोडीने मॅग्नेटकडून संघाच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव लागतो. या विषयावर चर्चा करण्यासाठी संघ प्रशासनाने मंगळवारी दुपारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. दुपारी दोन वाजता संघाच्या भवानी मंडप कार्यालयात सभा झाली. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी ही जागा ताब्यात घेण्यासाठी खर्च किती येणार, जागा ताब्यात आल्यानंतर संघाला उत्पन्न किती मिळू शकेल, याची माहिती सभेत दिली. यावर अमरसिंह माने, राजू पाटील-टाकवडेकर, प्रताप इनामदार, किरण पाटील, संभाजी पोवार, आकाराम पाटील, व्यंकप्पा भोसले आणि अ‍ॅड. ए. वाय. साळोखे यांनी सूचना मांडल्या. त्यानंतर हात वर करून ठरावासाठी मतदान घेण्यात आले. हा ठराव बहुमताने मंजूर झाला. ठरावाच्या विरोधात अ‍ॅड. ए. वाय. साळोखे, सुरेश देसाई यांच्यासह अन्य सभासदांनी विरोध दर्शवला. सभेला माजी अध्यक्ष युवराज पाटील यांच्यासह सभासद, माजी संचालक, आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते.

संघापुढील आव्हाने

मॅग्नेटकडील संघाची जागा ताब्यात घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजूर झाला आहे; पण सभेनंतर दोन तासांतच नवीन मंडळ नियुक्त झाले. नवीन मंडळ काय निर्णय घेणार, हे पाहावे लागले. संघाची नेसरीची जागा विकसित करावी लागणार आहे. संघाला मार्केटिंगच्या क्षेत्रातील कुशल कर्मचार्‍यांची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news