कोल्हापूर : शिवसेनेला जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनवा : मंत्री उदय सामंत

कोल्हापूर : शिवसेनेच्या शहर शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसैनिकांना शपथ देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर. शेजारी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, अरुण दुधवडकर, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, विजय देवणे आदी.                                            (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर : शिवसेनेच्या शहर शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसैनिकांना शपथ देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर. शेजारी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, अरुण दुधवडकर, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, विजय देवणे आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेला जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनवा तसेच शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून 12 दिवसांत शिवसैनिकांनी नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय घराघरांत पोहोचवावेत. जिल्ह्यात ज्यांनी छळले आहे, त्यांचे भविष्यातील निवडणुकीत बारा वाजले पाहिजे, एवढी शिवसेनेची ताकद निर्माण करावी. शिवसेना जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

कोल्हापूर शहर शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले; मात्र ते अनेकांना रुचले नाही. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करायचे व गैरसमज पसरविण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून रचले जात आहे. सगळ्यांचे ऐकून घेतो, सांगेल ते शिवसेना करील, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. महाविकास आघाडीत गट-तट, वादंग नको म्हणून शिवसैनिक शांत आहेत. त्यामुळे आम्हाला राजकीय ज्ञान नाही, असे कोणी समजू नये. आपला पक्ष वाढवित असताना दुसर्‍याचा पक्ष संपविण्याची भाषा केल्यास शिवसेना ताकदीने पाय रोवून प्रत्येक जिल्ह्यात उभी आहे, हे त्यांनी समजून घ्यावे.

पुढील 15 दिवसांत शिवस्वराज्य दिनाबाबत उच्चशिक्षण विभागाकडून जीआर काढण्यात येईल. पुढील वर्षी 6 जून रोजी सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी हातात भगवा झेंडा घेऊन शिवज्योत रॅली काढतील. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना गुढी उभारून त्यास भगवा झेंडा लावा, असे सांगितले. याचे काहींना दु:ख झाले. अशांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मंत्री सांमत म्हणाले.

शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, पक्षाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शहरातील सर्व प्रभागांत शिवसंपर्क अभियान राबवावे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, शिवसेनेने टोल आंदोलन, महापुरात महत्त्वाचे काम केले; मात्र त्याची जाहिरात करता आली नसल्याने मागे पडलो. निवडणुकीत मित्र समजलेल्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याने जिल्ह्यात सहा आमदार होते. त्यातील केवळ एकच
राहिला.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना शपथ दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक अंकुश निपाणीकर यांनी केले. जयवंत हारुगले यांनी आभार मानले. मेळाव्यास आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. सत्यजित पाटील सरूडकर, मंगल साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, चेतन शिंदे उपस्थित होते.

कोकणचा पंतप्रधान झाला तरी फरक पडणार नाही

कोण मंत्री झाले, यांच्याशी घेणे-देणे नाही. शिवसेनेचा विचार मानणारे आहोत. अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची तयारी ठेवली आहे. भाजपचे चारचे 40 मंत्री कॅबिनेट झाले व भविष्यात कोकणातील पंतप्रधान झाला, तरी शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता मंत्री सामंत यांनी केली..

..प्रसंगी शेतकर्‍यांच्या बाजूनेउभे राहण्याची तयारी ठेवा

'गोकुळ'च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहा जागा निवडून आल्या. गोकुळ दूध संघात यापूर्वी अनेकांनी राजकारण केले. परंतु, शेतकर्‍यांना किती फायदा दिला माहिती नाही. शिवसेनेच्या संचालकांनी शेतकर्‍यांच्या बाजूने राहून विरोधात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.

ग्रामपंचायत राखता आली नाही त्यांनी सल्ले देऊ नयेत

शिवसेना व पक्षप्रमुखांवर उटसूठ टीका करणार्‍यांना स्वत:ची ग्रामपंचायत राखता आली नाही. त्यांनी सल्‍ला देण्याची व डिवचण्याची गरज नाही, असा टोला मंत्री सामंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगाविला.

महापालिकेवर भगवा फडकवू : राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास काम करून अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. 1995 मध्ये सत्ता आल्यानंतर अनेक विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात कमी पडल्याने 1999 मध्ये पराभव झाला. तशी स्थिती यावेळी झाली. मित्रपक्षाच्या घातासह अनेक विकासात्मक कामे करूनही संपर्क कमी पडल्याने शिवसेनेचा पराभव झाला; पण पराभवाने न थांबता शिवसेनेने आपले काम अखंडपणे सुरू ठेवले. पुढील काळात ताकदीने काम करून महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवू, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news