कोल्हापूर : शिक्षक बदल्यांचा खेळखंडोबा

कोल्हापूर : शिक्षक बदल्यांचा खेळखंडोबा
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांच्या बदल्यांचा खेळखंडोबा अजूनही थांबलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून बदल्या न झाल्याने यावर्षी शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी मे महिन्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा बदल्यांचा कार्यक्रम जाहीर करून तो पुढे ढकलण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या होणार होत्या. परंतु, अर्जांची तपासणी करणे शक्य झाले नसल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा पुन्हा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षकांच्या बदल्या होतील.

निर्बंध उठविण्यात आल्यानंतर कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने दि. 4 मे 2022 रोजी कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर दि. 29 जून 2022 रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

गेल्या महिन्यात पुन्हा त्यात बदल करण्याचा निर्णय दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला. यानुसार जानेवारी 2023 मध्ये शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या. या बदल्यांकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, हा कार्यक्रम देखील रद्द करून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा सुधारित कार्यक्रम ग्रामविकास विभागाने जाहीर केला आहे. तसे पत्र जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार फेब्रुवारी2023 मध्ये आता शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे बदलीसाठी शिक्षकांना फेब्रुवारी पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष संवर्ग भाग 1 व 2 च्या शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य न झाल्यामुळे सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याचे ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

पुन्हा प्रक्रिया राबवावी लागणार

जिल्हा परिषदेच्याप्राथमिक शिक्षण विभागाला पुन्हा बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करण्यापासून प्रक्रिया राबवावी लागणार आहे. बदल्यांबाबत होत असलेल्या विलंबामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बदल्यांसाठी सुधारित केलेल्या कार्यक्रमादरम्यान परीक्षेचा कालावधी येतो. त्यामुळे या बदल्या पुढील शैक्षणिक वर्षातच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news