

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मंदौस चक्रीवादळामुळे राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. याचा फटका कोल्हापूरला देखील बसला. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. रात्री दहाच्या सुमारास काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. रविवारी किमान तापमान 20.8 अंश होते.
दरम्यान, आजरा, गडहिंग्लज, चंदगड आदी भागातही पाऊस झाला. शहरासह ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर पावसास सुरुवात झाली. ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.