कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई यांसह काही ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेक हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत लोकांना वेटिंग करावे लागले तर नववर्षाच्या स्वागताला देवदर्शनासाठी कोल्हापूर शहरात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकांनी कोरोनाचे संकट संपू दे, अशी प्रार्थनाही केली. शासन नियमांचे पालन करीत हॉटेल्समध्ये अनेकांनी सहकुटुंब मेजवानीचा आनंद लुटला. पार्सलसाठी हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती. अनेक ग्राहक रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये वेटिंगवर होते. तर अनेकांनी घरात थांबूनच नवीन वर्षाचे स्वागत केले.
जमावबंदी लागू असल्याने नवीन वर्षाच्या स्वागतावर गेल्या दोन वर्षांप्रमाणेच मर्यादा आल्या. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. तोच पुन्हा ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात निर्बंध लागू झाले आहेत. एरव्ही नववर्षाचे स्वागत हॉटेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून केले जाते. पण यावेळी निर्बंधामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ग्राहकांनी हॉटेल्समध्ये उपस्थिती लावली. शहरातील अनेक हॉटेल विद्युत रोषणाईने लखलखत होती.
होम डिलिव्हरीसाठी वेटिंग
गर्दीत जाणे टाळत अनेक नागरिकांनी आपल्या मनपसंत हॉटेलमधून लज्जतदार खाण्याची पार्सल ऑर्डर दिली. पण हॉटेलमध्ये जास्त गर्दी झाल्याने तेथेही ग्राहक वेटिंगला होते. त्यामुळे पार्सल सेवेला वेटिंग होते.
मटणासाठी रांगा
घरातच तांबड्या-पांढर्या रश्श्यावर ताव मारण्यासाठी मटण, चिकन तसेच मासे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मटणासाठी सर्वत्र रांगा लागल्याचे चित्र होते.
फार्म हाऊसवर गर्दी
कोरोनाचे निर्बंध लक्षात घेता पर्यटनस्थळे व फार्म हाऊसवर 31 चा जल्लोष साजरा करण्याला अनेकांनी पसंती दिली. शनिवार व रविवार वीकेंडचे औचित्य साधून अनेक फार्म हाऊस तसेच पर्यटन स्थळांवर गर्दी झाली होती. निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.