

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गळती लागलेल्या शिंगणापूर बंधार्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधार्याजवळ अद्याप दोन मीटर पाणी असल्याने तीन प्लेट काढण्यात अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री उशिरा किंवा आज (मंगळवार)सकाळी या प्लेट काढण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात मंगळवारीही पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंगणापूर बंधार्यावरून सोमवारीही काही प्रमाणात पाणी उपसा सुरू राहिल्याने शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा सुरळीत होता. काही भागात मात्र टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.
शिंगणापूर योजनेतून कोल्हापूर शहरास पाणीपुरवठा केला जातो. मात्र शिंगणापूर बंधार्याच्या लोखंडी प्लेट खराब झाल्याने त्या बदलण्याचे काम रविवारपासून हाती घेण्यात आले आहे. रविवारी 12 पैकी 8 लोखंडी प्लेट काढण्यात यश आले. मात्र बंधार्याजवळ पाणी असल्याने महापालिकेने पाणी उपसा सुरू ठेवून रविवारीही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.
सोमवारी सकाळी पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र बंधार्याजवळ तळबाजूला दोन मीटर पाणी असल्याने तीन प्लेट काढण्यात अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या प्लेट काढण्याचे काम सुरू होते. रात्रीत प्लेट न निघाल्यास मंगळवारी सकाळी या प्लेट काढल्या जाणार आहेत. प्लेट काढल्यानंतर त्वरित नवीन प्लेट बसविण्यात येणार आहेत.
नवीन प्लेट बसविल्यानंतर तत्काळ पाटबंधारे विभागाच्या मदतीने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मंगळवारी दुपारपर्यंत पाणी सोडल्यास शिंगणापूर बंधार्यापर्यंत पाणी येण्यास सात ते आठ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा बुधवारी सकाळी सरू करण्याचे नियोजन असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. पाणी उशिरा पोहोचल्यास बुधवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरू होईल. त्यामुळे ज्या भागात सकाळच्या सत्रात पाणी पुरवठा होतो, तेथे बुधवारीही पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.