

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा: प्रतापगडावरील अफजलखान कबरीलगतचे अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वच किल्ल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी वनविभागाच्या पथकाने विशाळगड पायथ्याची दोन अतिक्रमणे जमीनदोस्त करत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. दरम्यान, उर्वरित अतिक्रमणे १५ दिवसांत काढून घेण्याचा अल्टिमेटम वनविभागाने दिला असून अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
वनविभागाचे पथक शुक्रवारी सकाळीच गडावर दाखल झाले. वन विभागाच्या हद्दीतील बुरुजाजवळील दस्तगीर इस्माईल मुजावर यांचे तर गड पायथ्याचे पांडुरंग धोंडू धुमक यांचे थंड पेयाचे दुकान जमीनदोस्त केले. पक्क्या बांधकामाचे नुकसान होऊ नये म्हणून पायथ्याच्या एक एकरातील वीस जणांनी आपली अतिक्रमणे पंधरा दिवसांत काढून घ्यावीत, असा अल्टिमेटम जिल्हा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी पायथ्याला अतिक्रमणधारकांची बैठक घेऊन दिला.
विशाळगडावर चाँद इमारत व पुढील बुरुज परिसरात गट नं १०८२ (४९ ब ) परिसरात ८० एकर जमीन आहे. तर पायथ्याशी १०८१ गटातील एक एकरात पार्किंग, हॉटेल, कोल्ड्रिंक्सची दुकाने थाटली आहेत. प्रत्यक्षात २० मांडव दिसतात. पण ५१ जणांनी पायथ्याला जागा आरक्षित केल्याची माहिती माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी दिली. ग्रामपंचायतीने ही परवानगी कशी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, अतिक्रमण कारवाईमुळे गडावर शुकशुकाट पसरला होता. विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपूर्वी काढण्यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी (गुरुवारी) सकाळी साडेआठ वाजता वनविभागाच्या वतीने गडाच्या पायथ्याशी असणारे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. जंगल विभागाच्या जागेतील एका पत्रावजा शेडचे अतिक्रमण काढण्यात आले.
अतिक्रमण काढण्यापूर्वी गड पायथ्याशी असणाऱ्या अतिक्रमण धारकांची बैठक कोल्हापूर जिल्हा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. वनविभागाच्या जागेतील अतिक्रमणे १५ दिवसांत काढून घ्यावीत, असे त्यांनी सांगितले. अतिक्रमण न हटल्यास पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने काढली जातील. यात मोठे नुकसान होणार असल्याने त्वरित हालचाली करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एसटी थांबा जागेत अतिक्रमण करणाऱ्या पांडुरंग धुमक यांच्या चहाच्या टपरीचे तसेच लोखंडी शिडीनजीक असणाऱ्या दस्तगीर इस्माईल मुजावर यांच्या सरबत टपरीचे अतिक्रमण काढले.