file photo
file photo

कोल्हापूर : वाहन चोरी, चेन स्नॅचिंगमध्ये शिक्षित तरुणांचा वाढता सहभाग

Published on

कोल्हापूर ; दिलीप भिसे : विनासायास आणि झटपट कमाईच्या आमिषाला बळी पडून मिसरूडही न फुटलेली कोवळी पोरं संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारनाम्यांना बळी पडत आहेत. अवैध मार्गाचा अवलंब करून पैसे कमावण्याच्या प्रयत्नात ही पोरं रेकॉर्डवर येऊ लागली आहेत. 'लॉकडाऊन'मुळे बेरोजगार झालेली 18 ते 25 वयोगटातील शिकली सवरलेली पोरंही गंभीर गुन्ह्यांत चार भिंतीआड कोठडीत बंद होऊ लागली आहेत. तरुणाईतील वाढत्या गुन्ह्यांची डोकेदुखी भविष्यात धोक्याची घंटा ठरणारी आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मार्च 2020 ते फेब—ुवारी 2022 या काळात शहर, जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. या काळात संपूर्ण जीवनचक्र थंडावले होते. उद्योग-व्यवसायांतील उलाढाली थंडावलेल्या होत्या. कोट्यवधीच्या उलाढाली घडणार्‍या शेकडो फर्मनाही या काळात टाळेबंदी होती. परिणामी अगणित कारागिरांच्या हातातला रोजगार गेला. कामगार कपात झाली. हजारो बेरोजगार रस्त्यावर आले. मजुरांसह कुटुंबीयांच्या पोटापाण्याच्या प्रश्न गंभीर बनला.

अनलॉकनंतरही वाढतोय टक्का !

याच काळात शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीसह तस्करीच्या उलाढालीत कमालीची वाढ झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत घट होईल अशी अटकळ होती. मात्र, अनलॉक काळातही हे प्रमाण वाढतच राहिले आहे. जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन दिवसांपूर्वी तीन टोळ्यांना जेरबंद करून गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. शहरात मध्यवर्ती पेठांतून महागड्या दुचाकी चोरणार्‍या आणि चोरलेली वाहने परस्पर विक्री करणार्‍या टोळ्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. महामार्गावर दहशत माजवून प्रवाशांना लुटणारी तिसरी टोळीही गजाआड करण्यात आली आहे.

उच्चशिक्षित, पण…

अंलकार पाटीलसह साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून 24 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. वास्तविक संशयित तरुण मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यापैकी काहीजण उच्चशिक्षितही आहेत. टोळीतील संशयित कोट्यवधींची उलाढाल असणार्‍या एका नामांकित फर्ममध्ये नोकरीला होते. तेथील पगारावर त्यांच्यासह कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालायचा.

लॉकडाऊन अन् स्वप्नांचा चुराडा !

कोरोनाचा फैलाव झाला अन् समाजातील सर्वच घटकांचं आर्थिक गणित बिघडलं… उद्योग, व्यवसायांची चक्रे बंद पडल्याने संबंधित तरुण बेरोजगार झाले. भविष्यासाठी रंगविलेल्या त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला… गावापासून शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावर कोल्हापूरसह परिसरात आश्रयाला आलेल्या तरुणांचा आर्थिक कोंडमारा सुरू झाला. कपातीमुळे पगार नाही. त्यात उपासमार… कमाईसाठी वेगळीच शक्कल लढविली गेली… धंदा काय तर दुचाकींची चोरी… टोळीने सहा महिन्यांत शहर, जिल्ह्यातून 24 दुचाकींची चोरी करून त्यांची विक्री केली… असा हा बिनभोबाट धंदा सुरू होता.

…अन् शंकेची पाल चुकचुकली !

राजवाडा पोलिसांनी म्होरक्यासह 6 जणांना जेरबंद केले. चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली. कोरोना काळात नोकरी गेल्याने तरुणांनी वाहन चोरीचा मार्ग पत्करला. पाठोपाठ 'एलसीबी'ने महामार्गावर लूटमारी करणार्‍या टोळीला बेड्या ठोकून लूटमारीचे 11 गुन्हे उघडकीस आणले. या टोळीतील संशयितही 20 ते 25 वयोगटातील आहेत. रोजगाराचे साधन म्हणून संशयितांनी लूटमारीचा धंदा सुरू केला, हे फारच धक्कादायक म्हणावे लागेल.

विनासायास कमाईची चटक !

कोरोना काळात हातातला रोजगार गेला. कमाईचे साधन नसल्याने काळ्या धंद्यांसह तस्करी उलाढालीकडे तरुणांचा कल वाढला. त्यातून देशी, विदेशी दारू, अमली पदार्थ तस्करीमध्ये त्यांचा सहभाग वाढला. शहरासह ग्रामीण भागात जुगार अड्ड्यांचे पेव फुटू लागले. लॉकडाऊन शिथिल होऊनही अवैध व्यवसायांत गुरफटलेल्या तरण्या पोरांना विनासायास मुबलक कमाईची चटक लागल्याचे दिसून येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news