

कोल्हापूर : विकास कांबळे
आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वाढलेले सुमारे सहा हजार मतदान कोणाचे पारडे जड करणार, याकडे लक्ष लागले आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कारणांनी गाजत आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली. ही निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने या जागेवर आग्रह धरला. त्यामुळे महाविकास आघाडीतच जागा काँग्रेसला की शिवसेनेला, यावरून रस्सीखेच सुरू झाली.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाल्या. शिवसेनेने ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातून काही काळ रुसवेफुगवे सुरू राहिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडीतील सर्व मतभेद संपले आणि महाविकास आघाडी एकत्र प्रचारास लागली. भाजपनेदेखील ही जागा प्रतिष्ठेची केली. राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा घेण्याचा सपाटा लावला. महाविकास आघाडीनेदेखील अंतिम टप्प्यात राज्य पातळीवरील नेते प्रचारात उतरविले. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले गेले. निवडणुकीतील टोकाची ईर्ष्या आणि चुरस यामुळे जास्तीत जास्त मतदार बाहेर काढण्?याची तयारी दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आली होती. मात्र, केवळ 0.32 म्हणजे अर्धा टक्कादेखील मतदान वाढले नाही.