“कोल्हापूर लोकसभेसह 50 टक्क्यांपेक्षा अधिक विधानसभेच्या जागा ‘कमळा’वर लढवा”

“कोल्हापूर लोकसभेसह 50 टक्क्यांपेक्षा अधिक विधानसभेच्या जागा ‘कमळा’वर लढवा”

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात भाजपची घोडदौड वाढविण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासह विधानसभेच्या 50 टक्क्यांहून अधिक जागा भाजपने 'कमळ' चिन्हावर लढवाव्यात, अशी मागणी पदाधिकारी आणि नेत्यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय नागरी उडड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत झालेल्या पदाधिकारी, स्थानिक नेत्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. यावेळी शिंदे यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षबांधणीचा आढावा घेतला.

पश्चिम महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. सहकार क्षेत्रामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभे आहेत. आता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आहेत. त्यामुळे पक्षाने सहकारात विशेष लक्ष केंद्रित करावे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना कशी संधी देता येईल, यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे. सहकारात शिरकाव केल्यास जिल्ह्यात भाजप अधिक भक्कम होण्यास हातभार लागणार आहे, असेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये भाजप स्वतंत्र लढणार नाही. मात्र, भाजपचे कार्यकर्ते मैदानात आहेत. त्यामुळे किमान 300 ठिकाणी भाजपचा सरपंच होईल, याचे नियोजन केले पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूक पाहता या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवाव्यात. त्यामुळे विधानसभेसाठी चांगली वातावरणनिर्मिती होऊ शकते. यावेळी शिंदे यांनी बूथ शक्तीकेंद्रनिहाय पक्षबांधणीचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या भावना पक्षाच्या केंद्रीय कोअर कमिटीसमोर मांडून त्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. शिष्टमंडळात सुनील कुलकर्णी, भगतराम छाबडा, मुकुंद भावे, केदार जोशी, प्रतापसिंह दड्डीकर उपस्थित होते. यावेळी मंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, मकरंद देशपांडे, नाथाजी पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news