

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील शेतकर्यांना बँकेच्या प्रवाहात आणण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला काही ठरावीक राष्ट्रीयकृत बँकांनी हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे. एका मोठ्या बँकेने हातकणंगले तालुक्यातील आळते शाखा अनपेक्षितरीत्या बंद करून ग्राहकांना धक्का दिला आहे. आता अन्य बँकाही हीच पायवाट मळण्याच्या तयारीत आहेत.
ग्रामीण भागात बँकांचे जाळे नसल्याने विशेषत: शेतकर्यांची मोठी कुचंबणा होत होती. नाईलाजास्तव त्यांना खासगी सावकाराचे पाय धरावे लागत होते. सावकारी कर्जाचा फास आणि त्यांच्या 'पठाणी' वसुलीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हे वास्तव समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावागावांत शाखा सुरू झाल्या. घराशेजारी बँक आल्यामुळे शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद देत खाती सुरू करून बँकेशी व्यवहार सुरू केले. ठेवी, कर्जे, पीक कर्ज आदी सेवा सहज उपलब्ध होऊ लागल्याने शेतकर्यांमध्ये एकप्रकारे समाधानाचे वातावरण होते.
दोन वर्षांपूर्वी आळते येथे बँकेने शाखा सुरू केली. शेतकर्यांबरोबर काही संस्थांनी बँकेत व्यवहार सुरू केले; मात्र दोन वर्षांतच आर्थिक घडी बसत असतानाच अनपेक्षितपणे शाखा बंद करून 3 किलोमीटर अंतरावरील हातकणंगले शाखेत ती विलीन करीत असल्याची नोटीस लावली. 20 ऑक्टोबरपासून शाखा बंद होणार असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शाखा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही होत आहे. याबाबत बँकेशी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता याबाबत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.
बँकेने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सर्वसामान्य शेतकर्यांवर हा सरळसरळ अन्याय आहे. हातकणंगले शाखेत शासकीय व्यवहार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळणार नाही. निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील.
– किरण इंगवले, संचालक, बाजार समिती
बँकांच्या माध्यमातून शेतकर्यांसह प्रामुख्याने सहकारी दूध संस्थाही बँकेशी कनेक्ट झाल्या. दूध बिले थेट उत्पादकांच्या खात्यांवर जमा होऊ लागल्याने केंद्र सरकारचे कॅशलेस धोरण यशस्वी झाल्याचे चित्र ग्रामीण भागात तयार झाले.