

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : दीर आणि भावजय यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर शस्त्राने हल्ला करून खून केल्याप्रकरणी राजारामपुरी येथील प्रसन्न ऊर्फ बाळू ऊर्फ बळी सज्जन साठे ( वय 50, रा. 5 वी गल्ली) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (2) बी. डी. शेळके यांनी मरेपर्यंत कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, 21 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी दीर बाळू साठे व भावजय यांच्यात कौटुंबिक कारणातून भांडण लागले होते. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. शेजारील राहणारा संदीप सखाराम बेरड (वय 35, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) यांनी भांडणात समेटासाठी प्रयत्न केले.
आरोपी साठे याने संदीपला उद्देशून 'भांडणात मध्यस्थीचा तुझा काय संबंध?' असा सवाल करून त्याच्यावर धारधार चाकूने सपासप वार केले. छाती, पोटासह शरीरावर अन्य ठिकाणी खोलवर वार झाल्याने संदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रक्ताळळेला चाकू घराच्या छतावर टाकून आरोपीने तेथून पळ काढला.
तत्कालीन पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांनी आरोपीला बेड्या ठोकून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश शेळके यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू होती. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अमित महाडेश्वर यांनी सरकार पक्षामार्फत काम पाहिले.
खटल्यात 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी मंगल साठे, अश्विनी साठे फितूर झाल्या. अन्य साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद याच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.